'विराटला पुन्हा फॉर्ममध्ये आणायचं असेल तर त्याला फक्त इतकं सांगा की...'; शोएब अख्तरचा सल्ला

Shoaib Akhtar On Virat Kohli: विराट कोहलीला कोणत्याही फॉरमॅटमध्ये सध्या लय गवसत नसल्याचं दिसून येत आहे. असं असतानाच शोएबने हे विधान केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 18, 2025, 09:01 AM IST
'विराटला पुन्हा फॉर्ममध्ये आणायचं असेल तर त्याला फक्त इतकं सांगा की...'; शोएब अख्तरचा सल्ला title=
शोएबचा सल्ला

Shoaib Akhtar On Virat Kohli: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माबरोबरच अनेकांना विराट कोहलीच्या फलंदाजीची सध्या चिंता वाटत आहे. ऑस्ट्रेलियावरुद्ध पर्थच्या कसोटीत झळकावलेलं शतक वगळता विराटला जून महिन्यापासून लक्षात राहील अशी खेळी करता आलेली नाही. बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेमध्येही विराटला नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळेच आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी मालिकेमध्ये विराट कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. विराट पुन्हा जुन्या रुपात दिसेल असा विश्वास चाहत्यांना वाटत असतानाच काहींना मात्र याबद्दल शंका आहे. अशातच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने विराटला पुन्हा फॉर्ममध्ये आणण्यासाठी काय करता येईल याबद्दल एक रंजक विधान केलं आहे.

विराटची सर्वसाधारण कामगिरी

विराट कोहलीने सप्टेंबर महिन्यापासून खेळलेल्या 10 कसोटी सामन्यांमध्ये अवघ्या 22.47 च्या सरासरीने 382 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या नावावर एक शतक आणि अर्धशतकाची नोंदही आहे. क्रिकेटमघ्ये पदार्पण केल्यापासून विराटसाठी हे सर्वात कमी धावांचं वर्ष गेलं आहे. 2024 च्या आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळताना ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलेल्या विराटकडून अंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये चांगल्या खेळाची अपेक्षा होती. मात्र टी-20 वर्ल्डकपमध्ये विराटने 151 धाव केल्या आणि त्याही 112.68 च्या स्ट्राइक रेटने. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. आता विराट इंग्लंडविरुद्धची मालिका आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळणार आहे. ही विराटची एकदिवसीय क्रिकेटमधील शेवटची स्पर्धा मानली जात आहे. त्यामुळे विराट चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कसा खेळेल याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

शोएबनं सांगितला भन्नाट उपाय

मात्र एकीकडे विराटबद्दल शंका घेतली जात असतानाच शोएब अख्तरने 'इंडिया टुडे'शी बोलताना विराटने टी-20 वर्ल्डकपमध्ये 2022 साली मेलबर्नच्या मैदानावर ज्या पद्धतीची खेळी केलेली तशीच पुन्हा करावी यासाठी काय करता येईल हे सांगितलं आहे. "विराटने उत्तम कामगिरी करावी (त्याला हरवलेला फॉर्म गवसावा) असं वाटतं असेल तर केवळ त्याला इतकं सांगा की पुढचा सामना पाकिस्तानविरुद्ध आहे. मेलबर्नमध्ये विराटने केलेली खेळी परत एकदा पाहा. अपेक्षा आहे की बाबर आझम पाकिस्तानसाठी अशीच खेळी करेल. दुर्देवाने साईम आयुब हा दुखापत झाल्याने संघाबाहेर आहे. तो फकर झमानबरोबर छान पार्टनरशीप करु शकला असता. ही खरोखरच फार घातक सलामीवीरांची जोडी ठरली असती," असं शोएब म्हणाला.

हेच ते मैदान जिथे

भारत आणि पाकिस्तानचा सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबईच्या मैदानात होणार आहे. 2021 साली याच मैदानावर पाकिस्तानने भारताविरुद्ध 10 विकेट्सने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना जिंकला होता. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा विद्यान संघ पुन्हा अशीच कामगिरी करेल अशी अपेक्षा शोएबने व्यक्त केली आहे.

कोण जिंकणार?

"भारत आणि पाकिस्तान हे दोघेही चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदासाठी प्रमुख दावेदार आहेत. दोघांमध्ये छान सामना होईल आणि भरपूर धावा केल्या जातील असं मला वाटतं. दोन्ही संघांनी प्राण पणाला लावून खेळणं गरजेचं आहे. मात्र पाकिस्तानने जिंकावं असं मला वाटतं. पाकिस्तान यजमान संघ असून हा सामना जिंकल्यानंतर त्यांना घरच्या मैदानावर येऊन पुन्हा सामने खेळायचे आहेत. मात्र भारतीय संघ उत्तम असून बुमराह तर वन मॅन आर्मीच आहे," असं शोएबने म्हटलं आहे.