कोरोनाचं संकट नष्ट होण्यासाठी दुवा करा'; उद्धव ठाकरेंचं मुस्लिम बांधवांना आवाहन

संपूर्ण जगात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे  

Updated: May 24, 2020, 06:25 PM IST
कोरोनाचं संकट नष्ट होण्यासाठी दुवा करा'; उद्धव ठाकरेंचं मुस्लिम बांधवांना आवाहन  title=

मुंबई :  संपूर्ण जगात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे, तर दुसरीकडे सर्व मुस्लिम बांधवांमध्ये ईदची उत्सुकता आहे. पण यंदाच्या ईदीवर कोरोनाचं सावट असल्यामुळे मुस्लिम बांधवांना घरात राहून नमाज अदा करण्याचं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. आज जनतेशी साधलेल्या संवादात त्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्या देखील दिल्या. मुस्लिम बांधवांकडून देखील सहकार्य सहकार्य मिळत असल्याचं देखील त्यांनी सांगितले. 

'कोरोनाचं संकट दूर होण्यासाठी दुवा करा. ईदची नमाज घरातून करा, रस्त्यावर न येता गर्दी न करता, राज्याच्या.. राष्ट्राच्या... जगाच्या समृद्धीसाठी दुवा करा...' असं आवाहन त्यांनी मुस्लिम बांधवांना केलं. शिवाय कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. असं देखील ते म्हणाले, 'कोरोना  रुग्णांमध्ये अचानक थोडी वाढ झालेली आहे. हा विषाणू गुणाकार करत आहे आणि या गुणाकाराला मर्यादा नाही त्याचं तोच ठरवतो.' असं ते म्हणाले.

त्याचप्रमाणे मे महिन्याच्या शेवटी सव्वा ते दीड लाख कोरोना रुग्ण असू शकतील असा अंदाज केंद्राच्या टीमने व्यक्त केला होता. आजच्या दिवशी राज्यात ३३ हजार ६८६ रुग्ण आहेत. १३ हजार ४०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण ३ लाख ४८ हजार २६ टेस्ट झाल्या. दुर्देवाने १५७७ मृत्यू झाले आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिली. 

यावेळी त्यांनी कोरोनाच्या आणखी लक्षणांची माहिती देखील जनतेला दिली. सर्दी, खोकला, ताप याशिवाय थकवा, तोंडाची चव जाणे, वास न येणे अशी नवे लक्षणेही, ती अंगावर न काढता वेळीच डॉक्टरांना दाखवा. पावसाळ्यात विनाकारण भिजणे शक्यतो टाळा, रोगराई आणि साथी आपल्याला टाळायला हव्या, पाणी उकळून प्या असं देखील ते म्हणाले.