चिंता वाढली! राज्यात Omicron चे आणखी 8 रुग्ण, पाहा कुठे आढळले

कोरोनाचा नवा व्हेरिएंट omicron ने राज्यात चिंता वाढवली आहे

Updated: Dec 14, 2021, 07:36 PM IST
चिंता वाढली! राज्यात Omicron चे आणखी 8 रुग्ण, पाहा कुठे आढळले title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोनाचा नवा व्हेरिएंट omicron ने राज्यात चिंता वाढवली आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आज आणखी 8 रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी 7 रुग्ण मुंबईत तर 1 रुग्ण वसई-विरारमध्ये आढळला आहे.

आज ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या 8 रुग्णांचे नमुने डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात घेण्यात आलेले आहेत. 8 रुग्णांपैकी 3 स्त्रिया तर 5 पुरुष आहेत. हे सर्व रुग्ण 24 ते 41 वयोगटातील असून 3 रुग्णांना कोणतीही लक्षणं नाहीत तर 5 रुग्णांमध्ये सौम्य स्वरुपाची लक्षणं आढळली आहेत.

प्राथमिक माहितीनुसार यापैकी कोणाचाही आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास नाही. यापैकी एकाने बंगलोर तर एकाने दिल्ली प्रवास केला आहे. मुबईतील एक व्यक्ती राजस्थान मधील आहे.

8 रुग्णांपैकी 2 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तर 6 जण घरी विलगीकरणात आहेत. या रुग्णांच्या निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. या पैकी 7 रुग्णांचे लसीकरण पूर्ण झालं आहे तर एकाचं लसीकरण झालेलं नाही, अशी माहिती देण्यात आली आहे. 

राज्यात ओमायक्रॉनचे किती रुग्ण?
आजपर्यंत राज्यात आता एकूण ओमायक्रॉनची 28 प्रकरणं झाली आहेत. यात मुंबईमध्ये 12, पिंपरी-चिंचवडमध्ये 10, पुणे मनपात 2, कल्याण डोंबिवली, नागपूर, लातूर आणि वसई-विरारमध्ये प्रत्येकी 1 रुग्णाची नोंद झाली आहे. 

यापैकी 8 रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर (RT-PCR) चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.