मुंबई : दिशा सालियन बदनामी प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे राणे पिता पुत्रांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. दिंडोशी न्यायालयात आज याप्रकरणाची सुनावणी होणार आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे दिशा सालियन बदनामी प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यामुळे राणे पिता पुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर अटकपूर्व जामीनासाठी राणे पिता पुत्र यांनी दिंडोशी न्यायालयात धाव घेतली होती. त्याप्रकरणी न्यायालय आज फैसला सुनावणार आहे. राणे यांचे वकील सतीश माने शिंदे यांनी न्यायालयात बाजू मांडली तर, मालवणी पोलिसांच्या वतीने डीसीपी विशाल ठाकूर यांनी बाजू मांडली.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला दिला होता. या पत्राची दखल घेत अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले.
दिशा सालियान या सुशांतसिंग राजपूत यांच्या पूर्व व्यवस्थापक होत्या. तिच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला नव्हता. त्यावेळेस ती गरोदर देखील नव्हती, असे तिच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे.