धावणं विसरलेली मुंबापुरी लॉकडाऊनमध्ये अशी दिसतेय...

कोरोनामुळे सततचं हे धावतं शहर अक्षरशः स्तब्ध 

Updated: Apr 5, 2020, 02:53 PM IST
धावणं विसरलेली मुंबापुरी लॉकडाऊनमध्ये अशी दिसतेय... title=

मुंबई : स्वप्नांचं शहर मुंबई... ज्या महानगराला थांबणं कधी माहित नाही, ती मुंबापुरी... मात्र कोरोनामुळे सततचं हे धावतं शहर अक्षरशः स्तब्ध झालं आहे. अख्खा भारत मुंबईत ज्या ठिकाणी उतरतो, जी वास्तू मुंबईची शान म्हणून ओळखली जाते, ते छत्रपती शिवाजी टर्मिनस अक्षरशः सुनंसुनं झालं आहे. नेहमीच ओसंडून वाहणारा इथला जनसागर आता पुर्णपणे गडप झाला आहे. 

मरिन ड्राईव्हच्या अथांग समुद्रावरच्या लाटांची गाज ऐकायला आता कोणीच नसतं. तीच गत झाली आहे वरळी सी-लिंकची. दक्षिण मुंबईतलं महत्त्वाचं केंद्र चर्चगेट नेहमीची चाकरमानी आणि व्यापाऱ्यांची गर्दी हरवून बसलं आहे. 

इंग्रजांच्या काळापासून दिमाख मिरवणाऱ्या फ्लोरा फाऊंटनचं वैभव पाहायला आज कोणीच तिकडे फिरकतही नाही. अगणित भाविकांचं श्रद्धास्थान सिद्धीविनायक भक्तांविना सध्या एकटाच आहे. 

मुंबईच नाही तर अख्ख्या देशाचं लक्ष वेधणारं शिवसेना भवन सध्या माणसांची गर्दी शोधत आहे. भरधाव जाणाऱ्या गाड्यांचा भार पेलणारा टिळक ब्रिज आज ती चिरपरिचित लगबग विसरुन गेला आहे. 

तर दादर टीटीचा परिसर स्वतःचंच वजन पेलत आता एकलकोंडा होऊन बसला आहे. मुंबापुरीच्या बहुविविधतेचं वैशिष्ट्यं सांगणारा वांद्रे पश्चिमेचा परिसर एकटेपणाचा असह्य जाच सोसतोय. 

पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडणारा वांद्रे रेक्लमेशन भाग असंख्य ऑफिसं, संस्था आणि व्यापारी संकुलांचा आधार. मात्र हा भागही आता माणसांची चाहुल शोधतोय. इमारतींच्या दाटीवाटीतून जाणारा जेजे फ्लाय ओव्हर एकलकोंडा आणि केविलवाणा दिसतोय. 

रस्ते तेच आहेत, इमारतीही तशाच आहेत. मात्र नाही तो फक्त माणूस... हीच उणीव मायानगरी मुंबापुरीचा डसत आहे. कारण तिला तिचं पुर्वीचं वैभव हवं आहे. 

(ड्रोन व्हिज्युअल्स सौजन्य- मुंबई लाईव्ह)