गरीबांचा बर्गर महागला, वडापावला दरवाढीचा ठसका

मुंबईच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या वडापावच्या किंमतीत इतक्या रुपयांनी वाढ झाली आहे

Updated: Mar 16, 2022, 12:43 PM IST
गरीबांचा बर्गर महागला,  वडापावला दरवाढीचा ठसका title=

मुंबई : मुंबईच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असेलला आणि गरीबांचा बर्गर म्हणून ओळखाला जाणारा वडापाव महागला आहे. गरिबांची पोटपूजा, मध्यमवर्गीयांचे फावल्या वेळेतील उदरभरण आणि श्रीमंतांसाठी चवीचे खाणे असलेला वडापाव आता चक्क 20 रुपयांवर पोहोचलाय. रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे तेलाच्या किमती वाढल्या आहेत. तसंच सिलिंडरच्या दरातही वाढ झाली असून त्याचा परिणाम वडापावच्या किमतीवर झालाय. वडापावचे दर 5 ते 7 रुपयांनी वाढवण्यात आलेत.

मुंबईकरांचं लोकप्रिय फास्ट फूड असलेला वडापाव लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वानाच जवळचा वाटता. खवय्यांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळालेला वडापाव हातगाडीपासून थेट पंचतारांकित हॉटेलांच्या चकचकीत टेबलांवर पोहोचला आहे.

दोन-तीन रुपये किमतीपासून सुरु झालेला वडापावचा प्रवास 20 रुपयांपार्यंत पोहचला आहे. वडापाव मिळत नाही असा मुंबईत एकही भाग सापडणार नाही. पण आता तेल आणि गॅसच्या दरात झालेल्या वाढीने सर्वसामान्यांचा वडापाव महागला आहे.

गव्हाचं पीठ आणि बिस्कीटंही महागली
मॅगीनंतर आता गव्हाचं पीठ आणि बिस्कीटही महागली आहेत. त्यामुळे, गव्हाच्या सर्वच पदार्थांच्या दरात वाढ झाली आहे. युद्धामुळे गव्हाच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. जागतिक बाजारपेठेत 29 टक्के गव्हाचा वाटा आहे तर, 19 टक्के मक्याचा वाटा आहे. 

चिकन, मासेप्रेमींनाही महागाईची झळ
चिकन पाठोपाठ आता मासेही महागले आहेत. आवक घटल्याने मासळी महाग झाली आहे. पापलेट, कोळंबी व सुरमई या मासळींचे दर किलोला एक हजार ते 1200 रुपयांवर पोहचले आहेत. मासळीचे घटते प्रमाण, सातत्याने वातावरणातील बदल, शासनाच्या जाचक अटी, मच्छीमारांचे रखडलेले अनुदान आदी कारणांमुळे मासळी आवक घटल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

मिरची उत्पादनात घट
यंदा अतिवृष्टी आणि वादळामुळे मिरची उत्पादन घट झाली आहे. मसालासाठी वापरण्यात येणारी काश्मिरी आणि बेडगी मिरची महाग झाली आहे. गेल्या वर्षी 400 रुपयांना होलसेल भावात विकली जाणारी काश्मिरी मिरची यावर्षी 450 ते  650 रुपये किलो विकली जात आहे. तर बेडगी मिरची 280 ते 360 रुपये किलो विकली जात आहे.