मुंबईतील ऑफिसच्या वेळा बदलणार? नवी मुंबई- ठाण्यातील नोकरदार वर्गावर होणार परिणाम

Mumbai News : मध्य रेल्वेच्या एका निर्णयामुळं आणि एका मोहिमेमुळं मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील नोकरदार वर्गावर थेट परिणाम होणार असल्याची चिन्हं   

सायली पाटील | Updated: Jan 8, 2024, 04:27 PM IST
मुंबईतील ऑफिसच्या वेळा बदलणार? नवी मुंबई- ठाण्यातील नोकरदार वर्गावर होणार परिणाम  title=
Mumbai Local Central railway writes letter to offices requesting change in working hours

Mumbai News in Marathi: मुंबई लोकलनं (Mumbai Local) प्रवास करणाऱ्यांमध्ये दर दिवशी मोठ्या आकड्यानं नोकरदार वर्ग अपेक्षित ठिकाणी पोहोचतो आणि याच मार्गावरून घरीसुद्धा परततो. दर दिवशी लाखोंच्या संख्येनं प्रवासी मुंबई लोकलनं प्रवास करत, अपेक्षित स्थळी पोहोचतात. ज्यामुळं ठराविक वेळांना लोकलनं प्रवास करायचा म्हटलं तर, अनेकांनाच धडकी भरते. यामागचं कारण असतं ती म्हणजे लोकलमधील प्रचंड गर्दी. 

लोकलनं किमान वेळात अपेक्षित अंतर गाठता येत असल्यामुळं रस्ते मार्गाच्या तुलने (Job News ) नोकरदार वर्ग मोठ्या संख्येनं रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतो. त्यात हा प्रवास खिशालाही परवडणारा असल्यामुळं अनेक अडचणी आणि धोका पत्करत प्रवासी रेल्वे प्रवास करतात. उभं राहण्यासाठीही जागा नसणाऱ्या लोकलच्या दाराशी कसरत करून जागा मिळवतही प्रवास करणारी अनेक मंजळी असून, यामुळं अनेकदा रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा अपघाती मृत्यू होतो. अपघाती मृत्यूंचं हे सत्र रोखण्यासाठी आता मध्य रेल्वेनं 'शून्य मृत्यू' मोहिम हाती घेतली आहे. 

कार्यालयीन वेळा बदलणार? 

मध्य रेल्वेनं (Central Railway) हाती घेतलेल्या मोहिमेच्या धर्तीवर रेल्वे विभागाच्या वतीनं मुंबई, नवी मुंबई (Navi Mumbai) आणि ठाणे (Thane) विभागातील कार्यालयांना त्यांच्या वेळांमध्ये बदल करण्याचं विनंतीपर पत्र पाठवण्यात आलं आहे. मागील दोन महिन्यांमध्ये जवळपास 750 संस्थांना याबाबतचं पत्र मिळालं असून, 27 संस्थांनी या मोहिमेत सहभागी होत पत्राला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं कळत आहे. 

हेसुद्धा वाचा : कोस्टल रोड टोलमुक्त; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर जाणून घ्या कुठून कुठपर्यंत करता येणार प्रवास 

 

सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी प्रवास करत असताना अपघाती मृत्यू होण्याचं प्रमाण अधिक असतं. ज्यामुळं या वेळेतील हे मृत्यूचं प्रमाण कमी करून शुन्यावर आणण्यासाठी कार्यालयांनी वेळा बदलाव्यात यासाठी मध्य रेल्वेनं कार्यालयांना विनंती केली आहे. काही संस्थांनीत्या धर्तीवर कर्मचाऱ्यांसाठी नवं वेळापत्रक लागू केलं आहे, तर काही संस्थांमध्ये हा प्रस्ताव अद्यापही विचाराधीन आहे. परिणामी येत्या काळात मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील नोकरदार वर्गाच्या कार्यालयीन वेळांमध्ये बदल पाहायला मिळू शकतो. 

मागच्या वर्षीपासूनच पत्रव्यवहार 

उपलब्ध माहितीनुसार मध्य रेल्वेच्या वतीनं नोव्हेंबर 2023 पासूनच दक्षिण मुंबईतील (South Bombay) संस्थांना कार्यालयीन वेळा बदलण्यासाठीची पत्र पाठवली होती. ज्यानंतर शहरातील पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये असणाऱ्या संस्थांना ही पत्र देण्यात आली. आता ठाणे आणि नवी मुंबईतील शैक्षणिक, वैद्याकीय, अभियांत्रिक संस्थांना यासंदर्भातील पत्र देण्यात येत असल्याचं कळत आहे. 

रेल्वेप्रवासादरम्यान मृत्यू पावलेल्यांचा आकडा मोठा 

अधिकृत आकडेवारीनुसार मागील 9 वर्षांमध्ये रेल्वे रुळ ओलांडून 7831 प्रवाशांचा मृत्यू ओढावला होता. तर, लोकल प्रवासादरम्यान ट्रेनमधून पडल्यामुळं 3485 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मृतकांचा हा आकडा मोठा असल्यामुळं प्रवाशांना सुरक्षित रेल्वे प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वेनं एक पर्यायी वाट शोधली असून, त्यामध्ये आता त्यांना नेमकं किती यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असेल.