'बाबरपासून रिझवानपर्यंत सर्वांनाच...' पाकिस्तान क्रिकेट बोर्ड उचणार कठोर पाऊल

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघावर ग्रुप स्टेजमध्येच गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढावली. या खराब कामगिरीनंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कठोर पावलं उचण्याच्या तयारीत आहे. 

राजीव कासले | Updated: Jun 15, 2024, 07:56 PM IST
'बाबरपासून रिझवानपर्यंत सर्वांनाच...' पाकिस्तान क्रिकेट बोर्ड उचणार कठोर पाऊल title=

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघावर (Pakistan Cricket Team) ग्रुप स्टेजमध्येच गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढावली. पाकिस्तान संघ सुपर-8 (Super8) मध्ये जागा बनवण्यास अपयशी ठरला. ग्रुपमध्ये पाकिस्तानला सलग दोन पराभव पत्करावे लागले. पहिल्या सामन्यात यजमान अमेरिकेने सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने सहा धावांनी मात केली. तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानने कॅनाडाचा सात धावांनी पराभव केला. पण अमेरिका आणि आयर्लंडदरम्यानचा सामना पावसाने रद्द झाल्याने पाकिस्तानच्या स्वप्नांवर पाणी फिरलं.

आयर्लंडविरुद्धचा सामना रद्द झाल्याने अमेरिकेच्या खात्यात 5 गुण जमा झाले आणि अमेरिकेने सुपर-8 मध्ये जागा पटकाली. आता 16 जूनला पाकिस्तान आयर्लंडविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळेल. हा सामना पाकिस्तानने जिंकला तरी पाकिस्तानच्या खात्यात 4 पॉईंट जमा होतील. पण सामनाही पावसामुळे रद्द होण्याची शक्यता आहे. 

पीसीबी कठोर पाऊलं उचलणार
टी20 वर्ल्ड कपमधल्या खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) बाबर सेनेविरोधात कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. खेळाडूंच्या पगारात कटोती होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही अधिकारी आणि माजी खेळाडूंनी पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी यांना खेळाडूंच्या सेंट्रल कॉन्ट्रेक्टवर पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे.

पीसीबी अध्यक्षांनी संघाच्या खराब कामगिरीवर कठोर भूमिका घेतल्यास खेळाडूंच्या केंद्रीय कराराचा आढावा घेतला जाऊ शकतो आणि त्यांच्या वेतनात कपात केली जाऊ शकते.' T20 विश्वचषकातून पाकिस्तान संघाच्या लवकर बाहेर पडण्यामागे संघातील गटबाजी आणि महत्त्वाच्या क्षणी वरिष्ठ खेळाडूंच्या खराब कामगिरीचा ठपका ठेवला जात आहे.

पाकिस्तान संघात गटबाजी
कर्णधारपद गमावल्यानंतर शाहिन शाह आफ्रिदी बाबार आझमवर नाराज आहे. तर कर्णधारपदी विचार न केल्याने मोहम्मद रिझवानही नाखुश आहे. पाकिस्तानी मीडियानुसार संघात तीन गट आहेत. एका गटाचं नेतृत्व बाबर आझम करतो. तर दुसऱ्या गटाचं नेतृत्व शाहिन आफ्रिदी करतो. मोहम्मद रिझवानचा एक गट आहे. यातच मोहम्मद आमिर आणि इमाद वसीम सारख्या सीनिअर खेळाडूंच्या पुनरागमनामुळे संघातील परिस्थिती आणखी बिघडली आहे. 

पाक खेळाडूंचा पगार किती?
बाबर आझम, शाहिन आफ्रिदी आणि मोहम्मद रिझवान हे पीसीबीच्या सेंट्रल कॉन्ट्रेक्टच्या ग्रेड ए मध्ये आहेत. मीडिया रिपोर्टनुसार ग्रेड एमधल्या खेळाडूंचा मासिक पगार 13.53 लाख रुपये इतका आहे. तर ग्रेड बी मध्ये शादाब खान फर जमान, हारिस रौफ आणि नसीम खानचा समावेश आहेत. त्यांना प्रत्येक महिन्याला 9 लाख रुपये पगार मिळतो.

ग्रेड सी आणि ग्रेड डी मधल्या खेळाडूंना प्रत्येकी  2.25 ते 4.5 लाख रुपये मासिक पगार मिळतो. इमाद वसीमला ग्रेड सीमध्ये ठेवण्यात आलं आहे. तर इफ्तिखार अहमद, हसन अली आणि सॅम अयूबचा ग्रेड डीमध्ये समावेश आहे. याशिवाय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामने खेळ्याचीही फिस मिळते.

टी20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान संघ
बाबर आजम (कर्णधार), अबरार अहमद, आजम खान, फखर जमां, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफरीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सॅम अयूब, शादाब खान, शाहीन शाह अफरीदी, उस्मान खान.