शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, माजी महापौरांचा राजीनामा

 दळवी यांनी स्वतःहून पदाचा राजीनामा दिला की उद्धव ठाकरेंनी त्यांना द्यायला लावला ? अशी चर्चा यानिमित्तानं पक्षात सुरु झालीय.

Updated: Aug 12, 2018, 08:35 PM IST

मुंबई : शिवसेनेच्या ईशान्य मुंबईतील महिला पदाधिकाऱ्यांमध्ये गटबाजी उफाळून आली असतानाच, मुंबईचे माजी महापौर आणि ईशान्य मुंबई विभाग क्रमांक ७ चे विभागप्रमुख दत्ता दळवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द केलाय. शिवसेनेच्या मुखपत्रात ईशान्य मुंबईतील पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका आज जाहीर करण्यात आल्यात. त्यात दत्ता दळवी यांनी वैयक्तिक कारणांमुळं स्वतःच्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती देण्यात आलीय.

राजीनाम्यावर प्रश्नचिन्ह 

 दळवी यांनी स्वतःहून पदाचा राजीनामा दिला की उद्धव ठाकरेंनी त्यांना द्यायला लावला ? अशी चर्चा यानिमित्तानं पक्षात सुरु झालीय. दळवी यांच्या राजीनाम्यामागं काही वेगळी वादग्रस्त कारणं असल्याची चर्चा आहे. ईशान्य मुंबईतील महिला पदाधिकाऱ्यांनी काल उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीतच राडा केल्यानं हा वाद पेटलाय.