Mumbai BMC Employees News: राज्यातील विधानसभा निवडणुका संपल्या. महायुतीचे सरकारही स्थापन झाले. पण इलेक्शन ड्युटीवर गेलेले मुंबई महानगर पालिकेचे अनेक कर्मचारी अद्याप कामावर रुजू झाले नाहीत. अशा कर्मचाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे. लवकरतात नोकरीवर न परतल्यास कर्मचाऱ्यांना पगार कपातीचा सामना करावा लागू शकतो, असं पालिकेने म्हटलंय.
मुंबई पालिकेचे साधारण 5 हजारहून अधिक कर्मचारी राज्य विधानसभा निवडणुकीत गुंतलेले होते. निवडूक झाली, निकाल लागला, सरकार स्थापनही झाले. आता या कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या कामात रुजू होणे आवश्यक होते. पण महापालिकेचे हे कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झालेले नाहीत. ते कामावर परतण्यास विलंब करत असल्यामुळे विविध विभागांच्या कामकाजात अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, नागरी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना आठवडाभरात कामावर रुजू होण्याचा इशारा दिला.
तुम्ही कामावर रुजू झाला नाहीत तर पगार कपातीला सामोरे जावे लागेल, असे नागरी अधिकाऱ्यांनी आपल्या इशाऱ्यात म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीशी संबंधित कर्तव्ये, जबाबदारी सोपवण्यात आली होती. ज्यात मतदार याद्या तयार करणे, नवीन नोंदणी हाताळणे, यादा अपडेट करणे यांचा समावेश आहे. मतदार यादी, आणि निवडणुकीच्या दिवशी मतदान, मतमोजणी या कामाचे व्यवस्थापन संभाळण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती.
मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी एकूण 60,000 नागरी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणूक कर्तव्ये सोपवण्यात आली होती. गेल्या दोन महिन्यांत यापैकी अंदाजे 9 हजार 674 कर्मचाऱ्यांना विशेषतः निवडणुकीशी संबंधित कामांसाठी नियुक्त करण्यात आले होते. काहीजण त्यांच्या नियमित कर्तव्यावर परतले आहेत. तर उर्वरित कर्मचारी परत आले नाहीत. त्यामुळे कामात अडथळे निर्माण झाले आहेत.
या विलंबामुळे विविध नागरी विभागांच्या कामकाजावर थेट परिणाम झाला आहे. यानंतर पालिका प्रशासनाला नोटीस पाठवून कर्मचाऱ्यांना आपल्या कर्तव्याची जाणिव करुन द्यावी लागली.