Kalyan Durgadi Fort Mandir Or Masjid: ठाण्याला लागूनच असलेल्या कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यासंदर्भातील महत्त्वाचा निकाल आज सत्र न्यायालयाने दिला आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या दुर्गाडी किल्ल्यावर जागा नेमकी कोणाची याबद्दल कोर्टाने निर्णय सुनावला आहे. दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर आणि मशीद असल्याने या जागेचा वाद अनेक वर्षांपासून हिंदू संघटना आणि मुस्लिम संघटनेमध्ये रंगला होता. मुस्लिम संघटने या जागेवर दावा करत कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने आज ऐतिहासिक निर्णय देत दुर्गाडी किल्ल्याचा जागा ही राज्य शासनाच्या मालकीचाच असल्याच म्हणत, मुस्लिम संघटनेचा दावा कल्याण दिवाणी न्यायालयाने फेटाळलाय.
कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्याची जागा 1966 साली शासनाने घेतली होती. मात्र मुजलिसे मुशावरीन औकाफ ही मशीद संघटनेने ही जागा मुस्लिम धर्माच्या ईदगा आणि मशीद यांच्या मालकीची आहे. असा दावा करण्यात आला. त्यामुळे या जागेची मालकी घोषित करावी यासाठी 1974 साली न्यायालयात केस दाखल केला होता. या दाव्याच्या आधारे ठाणे जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून किल्ले दुर्गाडी इथे सुरु असलेल्या सुशोभिकरणाच्या कामास हरकत घेण्यात आली होती. या प्रकरणी यापूर्वी न्यायालयाने जैसे थे आदेश दिले होते. आज या प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली. हा दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. याबाबत सरकारी वकील सचिन कुलकर्णी यांनी ही जागा शासनाच्या मालकीची आहे, असे आदेश कोर्टाने दिल्याच सांगितलंय. न्यायलयाचा निर्णयानंतर हिंदू संघटनेचे पदाधिकारी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण दुर्गाडी किल्ल्यावर आरती करत केला जल्लोष साजरा केल्याचं पहायला मिळालं.
'कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्याची जागा मजलिसे मुशावरीन औकाफ यांच्या कायदेशीर मालकीची नाही. त्यांचा त्या जागेवर अधिकार नाही. त्यांनी दाखल केलेला प्रलंबित दावा मुदतबाह्य असल्याने हा दावा फेटाळण्यात आला आहे.' कल्याणचे प्रथमवर्ग दिवाणी न्यायधीश ए. एस. लांजेवार यांनी हा दावा फेटाळून लावलाय. दरम्यान शिवसेना शहर प्रमुख रवि पाटील यांनी कोर्टाचा निर्णयाचे स्वागत केलं. ते म्हणाले की, 'हा निकाल म्हणजे हिंदूचा विजय आहे. न्यायालयाने हिंदू धर्माला न्याय दिला आहे. सत्याचा विजय झाला आहे.'
अनेकदा या भागामध्ये धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या या प्रकरणावर निकाल लागल्याने आता हा वाद शांत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मागील काही वर्षांमध्ये बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लिम समुदायाकडून दुर्गाडी किल्ला या भागात असलेल्या मशिदीत नमाज अदा केली जाते. मात्र या कालावधीत खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर बंद ठेवलं जायचं. त्यामुळेच या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटना मोठ्या प्रमाणात आंदोलनं करायच्या. या वर्षीही जून महिन्यात बकरी ईदनिमित्त मंदिर बंद ठेवण्यात आल्यानंतर दुर्गाडी किल्ल्याबाहेर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केलं होतं. आम्हाला मंदिरात प्रवेश दिला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल अशीही भूमिका घेतली होती. बकरी ईदच्या दिवशी कल्याणच्या दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी घातली जाते.
90 च्या दशकात आनंद दिघेंनी याचा विरोध करत या ठिकाणी घंटानाद आंदोलन सुरु केलं होतं. यावर्षीही या ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आलं होतं. दर वर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक वाढल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येतो.