मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या दत्ता दळवींना जामीन मंजूर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे  

शिवराज यादव | Updated: Dec 1, 2023, 11:56 AM IST
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या दत्ता दळवींना जामीन मंजूर title=

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. दत्ता दळवी यांना मुलूंड कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने 437अंतर्गत काही अटीस्तव, 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. 

उद्धव ठाकरे गटातील नेते दत्ता दळवी यांच्या विधानानंतर मोठा वाद पेटला होता. दत्ता दळवी यांच्यावर भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दत्ता दळवींना न्यायालयात हजर करण्यात आलं असता तेव्हा, 12 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

पण यानंतरही दत्ता दळवी आपल्या विधानावर ठाम होते. “मी बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मी काम करतोय. मी केलेल्या वक्तव्याबद्दल वावगं वाटत नाही. कारण, आनंद दिघे यांच्याबरोबर मी काम केलं आहे. आनंद दिघे यांनी ‘धर्मवीर’ चित्रपटात जो शब्द वापरला, तोच मी बोललो आहे,” असं ते म्हणाले होते. 

“मी कुठलाही घाणेरडा शब्द वापरला नाही. मी मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केली नाही. मालवाणी भाषेत भरपूर शिव्या आहेत. त्या ऐकतानाही वाईट वाटेल. तसेच, मला तुरुंगवारी नवीन नाही आहे,” असंही दत्ता दळवींनी सांगितलं होतं.

दत्ता दळवी नेमकं काय म्हणाले होते?

26 नोव्हेंबरला भांडुपमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा कोकण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात दत्ता दळवी यांनी भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं. स्वत:ला हिंदूहृदयसम्राट म्हणून घेतात, असं म्हणत त्यांनी एक शिवी दिली आणि हिंदूहृदयसम्राटचा अर्थ माहिती आहे का? आज आनंद दिघे असते तर एकनाथ शिंदे यांना चाबकाने फोडून काढलं असतं, असं म्हणाले होते. 

कार अज्ञातांनी फोडली

दरम्यान दत्ता दळवींच्या विधानानंतर ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. यानंतर काही अज्ञातांनी दत्ता दळवींची कार फोडली होती.