मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या सतत वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकार, प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र तरीही कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक 1166 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एकट्या मुंबईत 1000हून अधिक कोरोनाबाधित आहेत. देशात मुंबईत सर्वाधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
3 फेब्रुवारी ते 10 एप्रिलपर्यंत तब्बल 19541 चाचण्या करण्यात आल्या आहेत. प्रत्येक 10 लाखांच्या मागे मुंबईत 1499 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात आतापर्यंत 31 हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
केरळमध्ये 13 हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. दिल्लीत 10 हजार तर तमिळनाडूमध्ये 8 हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. प्रत्येक 10 लाखांच्या मागे हे प्रमाण अनुक्रमे 398, 297 आणि 252 इतके येते.
देशाच्या उर्वरित भागात 1,10,072 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मुंबईत कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मुंबईत रॅपिड टेस्ट करण्यास परवानगी दिली आहे. आता मुंबई महानगरपालिकेने रॅपिड टेस्टसाठी वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. केवळ केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या किट्सवर अवलंबून न राहता मुंबई महानगरपालिका दक्षिण कोरियाकडून जवळपास 1 लाख रॅपिट टेस्ट किट्सची खरेदी करणार आहे. ही किट्स आल्यानंतर मुंबईतील वरळी आणि धारावी या कोरोना हॉटस्पॉट असणाऱ्या भागांमध्ये वेगाने रॅपिड टेस्ट केल्या जाणार आहेत.
रॅपिड टेस्टमुळे एखाद्या व्यक्तीच्या शरीरात संसर्ग झाला आहे किंवा नाही हे तात्काळ कळू शकतं. रॅपिड टेस्टमध्ये व्यक्तीला संसर्ग झाल्याचं आढळून आल्यास त्याची कोरोना टेस्ट केली जाईल. यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होण्यापूर्वीच त्यांना वाचवता येऊ शकतं.