मुंबई : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या (Dasara Melawa) वादात आता आणखी भर पडलीय. दसरा मेळाव्यावरून शिवसेनेतले (Uddhav Thackeray Group) ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) एकमेकांसमोर उभे ठाकलेत. त्यात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही (Mns Chief Raj Thackeray) दसरा मेळावा घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागलीय. (mns may be give dasara melawa 2022 after shiv sena and eknath shidne group)
शिवाजी पार्कवर दरवर्षी होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची ही परंपरा. पण यंदा हा मेळावा नेमका कोण घेणार, यावरून वाद सुरू झालाय. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार की, शिंदे गटाचा, याबाबत संभ्रम आहे.
या वादात आता उडी घेतलीय ती मनसेनं. राज ठाकरे हेच बाळासाहेब ठाकरेंच्या जहाल हिंदुत्ववादी विचारांचे खरे वारसदार आहेत. त्यामुळं त्यांनीच दसरा मेळावा घ्यावा, अशी गळ मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना घातलीय.
खरं तर उद्धव ठाकरे गटानं शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेकडं परवानगी मागितली. मात्र अजून ठाकरे गटाला परवानगी मिळालेली नाही. दरम्यान, काहीही झालं तरी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होईल, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय.
तर दुसरीकडे शिवाजी पार्कऐवजी ठाण्यामध्ये दसरा मेळावा होईल का, यादृष्टीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानं चाचपणी सुरू केलीय. आता मनसेचाही दसरा मेळावा होणार का? आणि झालाच तर राज ठाकरे हा मेळावा शिवाजी पार्कवरच घेणार का? याची उत्सूकता आता सगळ्यांना आहे.