आमदार तुकाराम कातेंची शिवसेनेच्या मंत्र्यांवर नाराजी, मुख्यमंत्र्यांचे कौतुक

शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी चक्क शिवसेना मंत्र्याबाबत आहे.

Updated: Sep 8, 2017, 03:12 PM IST
आमदार तुकाराम कातेंची शिवसेनेच्या मंत्र्यांवर नाराजी, मुख्यमंत्र्यांचे कौतुक title=

मुंबई : चेंबूर घाटला येथील शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी चक्क शिवसेना मंत्र्याबाबत आहे. मात्र, आपण नाराज असलो तरी भाजपमध्ये जाणार नसल्याचा खुलासा त्यांनी केलाय. त्यामुळे त्याच्या भाजप प्रवेशाबाबत पडदा पडलाय.

काते यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांवर आगपाखड करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मात्र स्तुतीसुमने उधळली आहेत. शिवसेनेच्या मंत्र्याना काम सांगितले तर ते होत नाही. मुख्यमंत्री मात्र जलदगतीनं काम करत असल्याचं सांगत त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केले आहे.  

मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक. मुख्यमंत्री यांना गणपतीला बोलावलं तर ते आले. आमच्या ज्येष्ठ मंत्र्याना आमंत्रण देऊनही ते फिरकले नाहीत. मुख्यमंत्री माझ्या गणपतीला येतात हे त्यांचं मोठेपण.मुंबई महापालिकेत सत्ता असतानाही आमच्या मतदारसंघातील कामे होत नाहीत. महापालिकेच्या कामगार वसाहतीच्या समस्यां सोडवल्या जात नाही.या कामगारांना घरातून बाहेर काढले तर मी माझ्या आमदार पदाचा राजीनामा  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देणार, असा इशाराही त्यांनी दिलाय.

शिवसेनेच्या मंत्र्याना काम सांगितले तर ते होत नाही पण मुख्यमंत्री मात्र जलदगतीने होते. मी तीन वर्षे माझ्या मतदार संघातील कामांसाठी आमच्या मंत्र्यांचे उंबरठे झिजवतो आहे. पण कामे होत नाहीत. मी भाजपमध्ये जाणार हा अपप्रचार, मिलिंद नार्वेकर यांच्या घरीही मुख्यमंत्री गणपतीला गेले होते मग ते भाजपमध्ये जाणार आहेत का ?उद्धव ठाकरे यांना एकच सांगणं की, कामे जलदगतींने व्हायला हवीत.