गुजराती, मारवाड्यांना प्राधान्य देणाऱ्या बिल्डरला मनसेचा दणका! थेट राज ठाकरेंपर्यंत पोहोचलं प्रकरण

Mumbai News : मीरा रोड येथे नव्या इमारतीत मारवाडी व गुजराती नागरिकांना प्राधान्य देणार असल्याची जाहिरात समोर आल्यानंतर नवा वाद पेटला आहे. मात्र प्रकरण वाढल्यानंतर गृहनिर्माण संस्थेने जाहिरात मागे घेत माफी मागितली आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 4, 2023, 11:20 AM IST
गुजराती, मारवाड्यांना प्राधान्य देणाऱ्या बिल्डरला मनसेचा दणका! थेट राज ठाकरेंपर्यंत पोहोचलं प्रकरण title=

प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : मुलुंडमध्ये (Mulund) मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारल्याचे प्रकरण ताजे असतानाच मीरा रोडमध्ये (Mira Road) एका नव्या इमारतीच्या गुजराती (Gujarati) व मारवाडी (Marvadi) यांना प्राधान्य असल्याच्या जाहिरात प्रदर्शित केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. मीरा रोडच्या मिलियन्स एकर या बिल्डर मार्फत सोशल मीडियावर या जाहिराती टाकण्यात आल्या होत्या.  या प्रकारावर मनसेने (MNS) विरोध केल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. मात्र आता संबंधित बिल्डरने या जाहिराती हटवून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडे घडलेल्या प्रकारबाबत पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे.

मीरा रोडमध्ये नव्याने बनवण्यात येणाऱ्या दिवाणी न्यालयासमोर मिलियन्स एकर या बिल्डर मार्फत नव्या संकुलाचे बांधकाम सुरु आहे. प्रोजेक्टच्या सोशल मीडियावर गुजराती मारवाडी लोकांना  प्राधान्य या जाहिराती टाकण्यात आल्या होत्या..या जाहिरातीत मारवाडी आणि गुजराती कुटुंबासाठी प्राधान्य असे कॅप्शन टाकून त्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. हा प्रकार उघडकीस येताच त्याला स्थानिक मनसेचे कार्यकर्ते संदीप राणे व सचिन पोपळे यांनी विरोध दर्शवून बिल्डर विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची  तयारी दाखवली होती. यावर संबंधित बिल्डरने या जाहिराती हटवून राज ठाकरे यांकडे घडलेल्या प्रकारबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. एका पत्राच्या माध्यमातून बिल्डरने हा माफीनामा प्रसिद्ध केला असून संबंधित जाहिराती डिलीट करण्यात आल्याचे त्यात म्हटले गेले आहे.

"मीरा भाईंदरमध्ये अतिशय चुकीचा प्रकार घडलेला आहे. गीता जैन यांचा हा प्रकल्प सोनम बिल्डरच्या नावाने हा प्रकल्प असल्याचे कळलं आहे. गीता जैन यांनी विसरुन जायला नको की गुजराती, मारवाडी नाही तर मराठी लोकांमुळेही त्या निवडून आल्या आहेत. बिल्डरने यासंदर्भात दिलगिरी व्यक्त केली आहे. पण ही दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ पुन्हा येऊ नये अशी मनसेची प्रामाणिक इच्छा आहे," असे मनसे कार्यकर्ते संदीप राणे यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलंय राज ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात?

"आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या पोस्टची आणि जाहिरातीची जबाबदारी घेतो ज्यामध्ये गुजराती आणि मारवाडी कुटुंबांना प्राधान्य दिले जाईल असे लिहिले होते. ते गुजराती आणि मारवाडी ग्राहकांचे लक्ष्य वळवण्यासाठी होते. यामागे माझा कोणताही हेतू नव्हता. सचिन पोखले आणि बाबू पाटील यांचा फोन आल्यानंतर आम्ही आमची जाहिरीत सोशल मीडियावरुन हटवली आहे. आम्हाला आमच्या कृत्याचा पश्चाताप आहे. आमची माफी स्विकार करावी अशी मागणी करतो. भविष्यात पुन्हाअशी चूक होणार नाही," असे मिलियन्स एकरने या पत्रात म्हटलं आहे. 

दरम्यान, मीरा भाईंदर शहरात मोठ्या प्रमाणात गुजराती, मारवाडी व मुस्लिम समाजाची वस्ती आहे. त्यात बांधकाम व्यावसायिकांनी जातीवरून असा वाद निर्माण करू नये, अन्यथा मराठीचा अपमान करणाऱ्यांना मनसे स्टाईलने धडा शिकवू अशी प्रतिक्रिया  मनसेचे संदीप राणे यांनी झी 24 तासशी बोलताना दिली आहे.