'सग्यासोयऱ्यांच्या संदर्भात आधीच कायद्यात...'; सरकारच्या अध्यादेशावर सदावर्तेंची महत्त्वाची प्रतिक्रिया

Maratha community Maharashtra Reservation : माझ्या मराठा बांधवांना EWS आरक्षणाच्या लाभापासून वंचित करण्यासाठी हे आंदोलन उभारलं होतं, असा आरोप वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. मराठा बांधवांनी कायद्याचे वाचन करावं असाही सल्ला सदावर्तेंनी दिला.

आकाश नेटके | Updated: Jan 27, 2024, 01:44 PM IST
'सग्यासोयऱ्यांच्या संदर्भात आधीच कायद्यात...'; सरकारच्या अध्यादेशावर सदावर्तेंची महत्त्वाची प्रतिक्रिया title=

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भातल्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठं यश आलं आहे. कुणबी नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्यावे आणि शपथपत्र घेऊन सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या या मनोज जरांगेंच्या मागण्या सरकारने मान्य केल्या असून त्यासंदर्भातील अध्यादेश काढला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं आहे. मात्र आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी याबाबत आक्षेप नोंदवत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सदावर्ते यांनी रोहित पवार आणि संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

"खुल्या वर्गातील लोकांच्या अधिकारांवर गदा येणार नाही याची जबाबदारी माझ्यावर आहे. माझ्या मराठा बांधवांना EWS आरक्षणाच्या लाभापासून वंचित करण्यासाठी हे आंदोलन उभारलं होतं. तो अध्यादेश नाही. ती नोटीस पाहिली म्हणून लवकरात लवकर न्यायालयाचे दार ठोठावण्यात येईल. ज्यांनी हे आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न केला ते रोहित पवार, संजय राऊत यांनी स्वतःची जागा तपासावी. मराठा बांधवांनी कायद्याचे वाचन करावे आणि कायद्यातील कलमे पाहावेत म्हणजे त्यांना स्पष्टपणे समजेल. सग्यासोयऱ्यांच्या संदर्भात जे बोललं गेलं ते कायद्यामध्ये आधीपासून अंतर्भूत आहे. ज्या गोष्टी अंतर्भूत आहे त्या गोष्टींवर वेळेचा अपव्यय होत आहे. त्यामुळे कुणीही या गोष्टीला मराठ्यांचा विजय म्हणू नये. आरक्षण जय परायजयाचे लक्षण नाही. ही जरांगेंकडून दिशाभूल करणारी बाब असू शकते. मी 17 दिवस उपोषण केलेला माणूस आहे. मला माहिती आहे की उपोषणाच्या पत्रामध्ये खाण्याची व्यवस्था करुन द्या असे लिहीलेले असते. पॉलिटिकल स्टंट म्हणून रोहित पवार आणि संजय राऊत यांनी उभं केलेलं हे कुभांड होतं," असा आरोप वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला.

"कायद्यात हे प्रकरण टिकू शकत नाही. कोणतीही मागच्या दाराने प्रवेश हा प्रकार कायद्याच्या संहितेत नाही. अशी कोणतीही तरतुद कायद्यात नाही. कुणबींना मागास कुणबी नाही हे स्पष्टपणे सांगितले गेले आहे. आजच्या सारख्या नोटिसेस दिल्या जाऊ शकतात मात्र कायद्यानुसार आरक्षण टिकू शकत नाही. जरांगे पाटलांचं काय ज्ञान आहे? त्यांनी कोणत्या विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतलीय? कोणती डॉक्टरेट मिळवलीय?," असा सवाल गुणरत्न सदावर्तेंनी उपस्थित केला आहे.

मनोज जरांगेंच्या नेमक्या कोणत्या मागण्या पूर्ण झाल्या? 307 सारखे गुन्हे मागे घेतले जाता का कधी? जरांगेंनी खरंच उपोषण केलं असेल तर त्यांनी काळजी घ्यावी, असाही सल्ला गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.