Sheetal Mhatre : हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत?; व्हायरल व्हिडीओवरुन शीतल म्हात्रे संतापल्या

Sheetal Mhatre : फेसुबकवर मातोश्री नावाच्या पेजवरून आणि ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हा व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. या सर्व प्रकारानंतर शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय

Updated: Mar 12, 2023, 11:37 AM IST
Sheetal Mhatre : हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत?; व्हायरल व्हिडीओवरुन शीतल म्हात्रे संतापल्या title=

Maharashtra Politics : मागाठणेचे आमदार प्रकाश सुर्वे (prakash surve) आणि शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे. आमदार प्रकाश सुर्वे, शीतल म्हात्रे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे शनिवारी श्रीकृष्ण नगर या ठिकाणी नदीवरील पुलाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीच्या दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडिओ ठाकरे गटाने (Thackeray Group) चुकीच्या पद्धतीने तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा दावा शीतल म्हात्रे यांनी केला आहे. त्यानंतर संतापलेल्या शीतल म्हात्रे यांनी मध्यरात्री दहिसर पोलीस ठाणे (dahisar police) गाठत तक्रार दाखल केली आहे.

हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर सोशल मीडियावर एक मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल केला जात असल्याचा दावा शीतल म्हात्रे यांनी केला आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे यांनी शनिवारी मध्यरात्री कार्यकर्त्यांसह दहिसर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली आहे. ठाकरे गटाच्या आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनीच हा व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रेंनी केला आहे. 

शनिवारी शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल करण्यात आल्याचा आरोप शीतल म्हात्रेंनी केला. पोलिसांत तक्रार झाल्यानंतर दहिसर पोलिसांनी याचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.

शीतल म्हात्रेंनी मांडली भूमिका

दरम्यान, या प्रकरणी शीतल म्हात्रे यांनी ट्विटरवरुन या प्रकरणाबाबत आपली भूमिका मांडली आहे. "राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले, तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत? मातोश्री नावाच्या फेसबुक पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले?", असा सवाल शीतल म्हात्रे यांनी केला आहे. 

तसेच "आज मी कुणाची तरी आई, कुणाची तरी बहीण आहे. विरोधकांच्या घरीही महिला आहेत. अशा वेळी इतक्या खालच्या थराला जाऊन खोटे व्हिडीओ टाकणे, अश्लील संदेश टाकणे हा प्रकार अत्यंत वाईट आहे. विरोधक एखाद्या महिलेच्या संदर्भात इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात, हे दिसून येतंय. हा व्हिडीओ युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी", अशी मागणी देखील शीतल म्हात्रे यांनी केली आहे.