Maharashtra Politics : छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर शरदचंद्र पवार गट (Sharad Pawar Group) तुतारीने निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस (Tutari) हे चिन्ह दिलंय. शरद पवार गट आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत (Election) तुतारी घेऊन रिंगणात उतरणार आहे. आणि याच तुतारी चिन्हाचा किल्ले रायगडावर (Raigad Fort) भव्य लॉन्चिंग सोहळा होणार आहे...
शरद पवार नावाचा संघर्षशील योद्धा
1978 साली शरद पवारांनी सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला.सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्यावरुन शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला. राष्ट्रवादी काँग्रेस या नवीन पक्षाची स्थापना करत घड्याळ चिन्ह राज्यात घरोघरी पोहोचवलं. वय वाढलं तरी पवारांचा संघर्ष कमी झाला नाही. साताऱ्यात भरपावसात सभा केली आणि राज्याच्या राजकारणाचा चेहरामोहराच बदलून टाकला. मविआचं सरकार स्थापन करत पवारांनी भाजपला धोबीपछाड दिली. पुतण्या अजित पवारांनी साथ सोडली. राष्ट्रवादीत फूट पडली. जो पक्ष वाढवला, मोठा केला.. तोच पक्ष आणि चिन्हही निवडणूक आयोगाने अजित पवारांकडे दिला. तरीही शरद पवार डगमगले नाहीत..
आता शरद पवार नावाचा संघर्षशील योद्धा पुन्हा नवीन पक्ष, नवीन नाव आणि नवीन चिन्हासह राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहे. हाती तुतारी घेत शरद पवार पुन्हा रान पेटवण्यासाठी सज्ज झालेत. आमच्या पक्षाला तुतारी हे चिन्ह मिळने हा सकारात्मक संकेत आहे आणि तुतारी महाराष्ट्राच्या जनमानसांच्या हृदयात आहे अशी भावना शिरूर चे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलीय. ही तुतारी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ललकारी ठरेल असं ही कोल्हे यांनी स्पष्ट केलं.
नवीन चिन्ह बिंबवण्याचं आव्हान
शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे घड्याळ हेच चित्र लोकांच्या मनावर बिंबलं गेलंय. त्यामुळे तुतारी हे नवीन चिन्ह लोकांच्या मनात बिंबवण्याचं काम तेवढं सोपं नाही. शरद पवारांनी ज्यावेळी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्ष काढला. त्यावेळी निवडणुका झाल्या, त्यावेळी लोकांना विचारले त्यावेळी त्यांनी सांगितले की आम्ही मतदान शरद पवारांनाच केले. त्यांना चिन्ह विचारल्यानंतर ते म्हणाले की, हाताच्या चिन्हाला मतदान केले. त्यामुळे राजकीय पक्षांचे चिन्ह लोकांच्या मनावर बिंबवणे सोपं नाही.
2019 ची साताऱ्यातली भर पावसातली पवारांची ती सभा आजही सर्वांच्या लक्षात आहे.पावसातली ती सभा राष्ट्रवादीसाठी संजीवनी ठरली. ऐन मतदानाआधी पवारांनी राजकीय वातावरणच बदलून टाकत 54 आमदार निवडून आणले. तेल लावलेला पैलवान ही शरद पवारांची राजकीय ओळख. पवारांचे डाव भल्याभल्यांना चक्रावून सोडणारे राहिलेत. शरद पवार या नावाला त्यामुळेच विरोधक दचकून असतात. अजित पवारांनाही हे ठावूक आहे. आता किल्ले रायगडावरुनच शरद पवार कोणता नवा डाव टाकतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.