'...काँग्रेसला संपवण्याची सुपारी घेतली आहे,' झिशान सिद्दीकीचं मोठं विधान, 'मी मुस्लीम असल्याने...'

बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केल्यानंतर झिशान सिद्दीकी यांना मुंबई युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं. यानंतर त्यांनी काही गंभीर आरोप केले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Feb 23, 2024, 11:49 AM IST
'...काँग्रेसला संपवण्याची सुपारी घेतली आहे,' झिशान सिद्दीकीचं मोठं विधान, 'मी मुस्लीम असल्याने...' title=

काँग्रेसचे माजी नेते बाबा सिद्दीकी यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांना अलीकडेच पक्षाच्या मुंबई युनिटच्या युवा शाखेच्या अध्यक्षपदावरून पदच्युत करण्यात आलं आहे. यानंतर झिशान सिद्दीकी यांनी पक्षात असतानाही नेतृत्वाला भेटण्यासाठी आपल्याला किती अडथळ्यांचा सामना करावा लागला याचा खुलासा केला आहे. झिशान सिद्दीकी यांनी सांगितलं की, आपलं वजन जास्त असल्याने राहुल गांधींना भेटता आलं नाही. 

झिशान सिद्दीकी यांनी दावा केला आहे की, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्राच्या नांदेडमध्ये पोहोचली होती. यावेळी राहुल गांधीच्या निकटवर्तीयांनी आपल्याला सहभागी होण्यासाठी 10 किलो वजन कमी करावं लागेल असं सांगितलं होतं. ते म्हणाले की, "मागील भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये असताना मला राहुल गांधीच्या एका निकटवर्तीयाने सांगितलं की, त्यांना भेटण्याआधी 10 किलो वजन कमी करावं लागेल".

झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेसवर इतरही आरोप केले आहेत. झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेसमधील अल्पसंख्याक नेत्यांसह होणाऱ्या कथित गैरवर्तनावर टीका केली असून पक्षावर भेदभावपूर्ण आणि जातीय' दृष्टिकोन असल्याचा आरोप केला आहे. 

"अल्पसंख्यांक नेते आणि कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये दिली जाणारी वागणूक दुर्दैवी आहे. काँग्रेस आणि मुंबई युवक काँग्रेसमध्ये जितका जातीयवाद आहे, तितका कुठेही नाही. काँग्रेसमध्ये मुस्लीम असणं पाप आहे का? मला लक्ष्य का केलं जात आहे याचं उत्तर पक्षाला द्यावं लागणार आहे. फक्त मी मुस्लीम आहे हे कारण आहे का?", अशी विचारणा झिशान सिद्दीकी यांनी केली आहे.

झिशान सिद्दीकी यांना काँग्रेस पक्षाने मुंबई युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन हटवलं आहे. बाबा सिद्धीकी यांनी पक्षाचा राजीनामा देत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. बाबा सिद्धीकी यांनी तब्बल 50 वर्षांनी पक्षाची साथ सोडली आहे. 

वांद्रे पूर्वचे आमदार असणारे झिशान सिद्दीकी यांनी आपल्याला पदावरुन हटवताना अधिकृतपणे योग्य संभाषण झालं नसल्याचा आरोपा केला आहे.  या पदासाठीच्या निवडणुकीत 90 टक्के मतं मिळवूनही पक्षाला आपली नियुक्ती करण्यासाठी 9 महिने लागले, असाही आरोप त्यांनी केला आहे. 

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेदेखील पक्षात मुक्तपणे काम करु शकत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. "मल्लिकार्जून खर्गे हे वरिष्ठ नेते असून, त्यांचेही हात बांधलेले आहेत. राहुल गांधी आपलं काम व्यवस्थित करत आहेत, पण त्यांच्या शेजारी असणाऱ्या लोकांनी जणू काही इतर पक्षांकडून काँग्रेसला संपवण्यासाठी सुपारी घेतली आहे," असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.