उद्धव ठाकरेंची ताकद वाढली; माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंचा पुन्हा ठाकरे गटात प्रवेश

Shivsena : शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आज मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वाकचौरे यांनी पक्षप्रवेश केला आहे. अनेक कार्यकर्त्यांसह भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केले आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 23, 2023, 02:04 PM IST
उद्धव ठाकरेंची ताकद वाढली; माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंचा पुन्हा ठाकरे गटात प्रवेश title=

Maharashtra Politics :  शिर्डीचे (Shirdi) माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Vakchoure) यांनी आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला आहे. उत्तर नगर जिल्ह्यातील शेकडो संर्थकांसह शिवबंधन बांधण्यासाठी वाकचौरे शिर्डीतून मातोश्रीवर दाखल झाले आहेत. 

शिर्डी लोकसभा मतदारसंघात 2009 साली रामदास रामदास आठवले यांचा पराभव करत शिवसेनेकडून खासदार झालेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज पुन्हा घरवापसी केली आहे. 2014 साली उमेदवारी जाहीर होऊनही वाकचौरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर त्यांना सलग दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेस, भाजप असा प्रवास करून भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज मातोश्रीवर हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला आहे. उद्धव ठाकरेंच्या हस्ते वाकचौरे यांनी हाती शिवबंधन बांधले आहे. आपल्या शेकडो संर्थकांसह वाकचौरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

शिवसैनिक चुकीला माफी देतो पण पापाला नाही - उद्धव ठाकरे

"भाऊसाहेब मला भेटले आणि त्यांनी सांगितले की मी चूक केली. तुमची आणि मातोश्रीची माफी मागतो. मी म्हटलं माझी माफी मागितली नाही तरी चालेल पण माझ्या शिवसैनिकांची मागा. राजकारणात आपण पक्षांतरे पाहिली. पण संपवण्याचे राजकारण करणारे कारस्थानी आणि पक्ष आपण पहिल्यांदा पाहत आहोत. जर एखादा चुकलो तर शिवसैनिक त्याला माफ करतो. शिवसैनिक चुकीला माफी देतो पण पापाला माफी देत नाही. आपल्याला जे पापी आहेत त्यांना संपवायचे आहे," अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी या पक्षप्रवेशांनंतर दिली आहे.

"आपल्यासमोरचं आव्हान खूप मोठं आहे. हा बुलंद आवाज आता दिल्लीच्या तख्तावर जे राजकारणी बसले आहेत त्यांच्या तख्ताच्या ठिकऱ्या उडवल्याशिवाय राहणार नाही. श्रद्धा आणि सबुरी राजकारणामध्ये दोन्ही गोष्टींची अवस्था असते. आताजे सत्तेत बसले आहेत त्यांना सबुरी अजिबात नाही. मी एकटाच आणि बाकीचे पक्ष संपवून टाकेल ही मस्ती आपल्याला उतरवायची आहे," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.