आताची मोठी बातमी! ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का, 'हा' आमदार शिंदेंच्या गळाला?

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटातील आणखी एक आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. 

कपिल राऊत | Updated: Feb 8, 2024, 06:28 PM IST
आताची मोठी बातमी! ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का, 'हा' आमदार शिंदेंच्या गळाला? title=

Maharashtra Politics : ठाकरे गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून (CM Eknath Shinde) सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे गटाचा (Thackeray Group) आणखी एक आमदार शिंदेंच्या गळाला लागला असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या या आमदारामध्ये गुप्त बैठक पार पडल्याचीही माहिती सूत्रांनी दिलीय. एकनाथ शिंदेंसोबत काम करण्याची इच्छा या आमदाराने बोलवून दाखवल्याची माहिती मिळतेय. येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या आमदाराचा पक्ष प्रवेश होण्याचीही शक्यता आहे. या आमदाराच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे गटाला आणखी दोन धक्के बसण्याचीही शक्यता आहे. कारण ठाकरे गटाचे आणखी दोन आमदारसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

कोणता आमदार शिंदे गटात जाणार?
आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे गटाला शिवसेनेचे कार्यकर्ते कंटाळले आहेत, अनेक जण शिंदे गटात येण्यास इच्छूक असल्याचं म्हटलं आहे. धमक्यांना घाबरुन कोणीही शिंदे गटात येत नाहीए, ठाकरेंच्या कारभाराला कंटाळून येत असल्याचंही शिरसाट यांनी स्पष्ट केलंय. याचे त्याचे फोटो दाखवून, याला-त्याला ब्लॅकमेल करण्याचं काम ठाकरे गटात सुरु आहे. असा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष नव्हता. त्यामुळे जे बाळासाहेबांचे विचार घेऊन जात आहेत त्या एकनाथ शिंदेबरोबर येण्यास अनेक जण इच्छूक असल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय. 

संजय राऊत यांचा आरोप
ठाकरेंना सोडा..पक्षांतर करा.. नाहीतर तुरुंगात जा अशा धमक्या रवींद्र वायकरांना मिळत असल्याचा संजय राऊतांनी केलाय. रवींद्र वायकरांवरील ईडी कारवाईवरून संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय. हा एक प्रकारे दहशतवाद आहे असं संजय राऊतांनी म्हंटलं. वायकर अशा धमक्यांना भीक घालणार नाहीत असंही राऊत म्हणालेत.  

बाबा सिद्दीकींचा राजीनामा
शिंदे गट वि. ठाकरे गट आमने सामने असतानाच तिकडे माजी आमदार बाबा सिद्दीकींनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलीय. सिद्दीकींनी राजीनामा दिल्याने मिलिंद देवरांपाठोपाठ मुंबईत काँग्रेसला दुसरा मोठा धक्का बसलाय. आपण लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं. तर स्व:ताचे निर्णय घेण्यासाठी झिशान सिद्दीकी सक्षम आहेत असं सांगत झिशान सिद्दीकींच्या पक्षप्रवेशाबाबत त्यांनी मौन बाळगलंय.