मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2019) प्रचाराला चांगलाच जोर दिसून येत आहे. स्थानिक तसेच राष्ट्रीय नेत्यांच्या दिवसाला एकाचवेळी चार ते पाच सभा होत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात प्रचाराची रंगत दिसून येत आहे. निवडणूक प्रचार संपायला केवळ ४८ तास शिल्लक आहेत. शेवटच्या टप्प्यात सर्वच पक्षांनी प्रचारासाठी जोर लावला आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार, अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभांचा धडाका दिसून येत आहे.
तसेच भाजपकडून पंतप्रधान मोदी, अध्यक्ष अमित शाह यांच्या सभा घेण्यात येत आहेत. काँग्रेसकडून राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सभा होत आहेत. महाराष्ट्रात एकूण ३२३७ उमेदवार विधानसभा निवडणुका लढवत आहेत. गुरुवारी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार बहुजन समाज पक्ष (बसपा) जास्तीत जास्त जागा लढवत आहे. बसपा २६२ तर भाजप १६४ जागांवर लढत आहे. १४ युतीचे उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत. भारतीय कम्युनिस्ट पार्टी १६, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आठ जागांवर लढत आहे.
त्याचप्रमाणे काँग्रेस १४७, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) १०१ आणि राष्ट्रवादी काँग्रेस १२१ जागांवर निवडणूक लढवित आहेत. शिवसेना १२४ जागा लढवत आहे. यामध्ये अपक्षांची संख्या १४०० आहे. ३००१ पुरुष आणि २३५ महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
वयोमानानुसार मतदारांविषयी सांगायचे झाले तर १८ ते २५ वयोगटातील मतदारांची संख्या १,०६,७६,०१३ आहे. २५ ते ४० वयोगटातील मतदारांची संख्या ३,१३,१३,३९६ आहे आणि ४० ते ६० वयोगटातील मतदारांची संख्या ३,२५,३९,०२६ आहे. तर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मतदारांची संख्या १,५१,९३,५८४ आहे.
मतदारांच्या संख्येनुसार सर्वात मोठा विधानसभेचा मतदारसंघ हा पनवेल आहे. याठिकाणी ५,५४,८२१ मतदार आहेत. वर्धा हा सर्वात छोटा विधानसभेचा मतदारसंघ आहे. या ठिकाणी २,७७,९८० मतदार आहेत.
२१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आणि याचा निकाल २४ ऑक्टोबरला लागणार आहे. राज्यात एकूण ८,९७,२२,०१९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी ९६,६६१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.