Maharashtra Politics : महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा निर्णय घेण्यात आला होता. औरंगाबाचं नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय मविआ सरकारने घेतला.
पण त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. सकारने मविआ सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली. यावरुन विरोधकांनी जोरदार टीका केली. मात्र निर्णयाला स्थगिती देण्यामागचं कारण सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नामांतर करण्यावर उद्याच्या कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब करणार असल्याची घोषणा केली.
औरंगाबादचे नाव संभाजीनगर हे बाळासाहेबांचे स्वप्न आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतलेल्या नामांतर आणि नामकरणाच्या निर्णयांना शिंदे सरकारने स्थगिती दिल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी दिला दुजोरा
राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचं पत्र दिल्यानंतर त्या सरकारने बहुमत सिद्ध करेपर्यंत कोणताही निर्णय घेणं अयोग्य आहे. म्हणून औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देणं, हे ठराव केलं होते, मुळात मविआ सरकार अडीच वर्षात सत्तेत होते, तेव्हा त्याला हात लावला नाही, पण ज्या दिवशी बहुमत गमावलं, त्या दिवशी त्यांनी कॅबिनेटची बैठक घेतली जी संकेताला धरून नाहीए असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
ही नावं द्यायचीच असल्याने ज्या सरकारकडे संपूर्ण बहुमत आहे, त्या सरकारचं मंत्रीमंडळ याला मान्यता देईल, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांना स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, ही नावं महत्वाची आहेत, आमच्या अस्मितेची आहेत, आमच्या पुढच्य कॅबिनेट बैठकीत ती ठेवण्यात येतील, आणि हे तीनही निर्णय आमचं सरकार घेईल असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.