दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई : प्राणी आणि पक्षांचे अनेक डॉक्टर्स तुम्ही पाहीले असतील पण आज आपण एका अशा पक्षीप्रेमी महीला डॉक्टरला भेटणार आहोत जो पक्षी मुळात आपल्या देशातलाच नाहीय चला तर मग भेटूयात पेंग्विनच्या डॉक्टर मधुमिता काळे यांना... 'दुर्गे दुर्घट भारी'मध्ये...
राणीच्या बागेतले हे हम्बोल्ट पेंग्विन... आणि परदेशातून आलेल्या या पाहुण्यांची काळजी घेणारी ही डॉ. मधुमिता काळे... बॅचलर आणि मास्टर्स इन वेटेनरी सायन्स केल्यावर मधुमितानं 'वाईल्ड लाईफ'मध्ये स्पेशलायझेशन केलंय.
राणी बागेतल्या पेंग्विन केंद्रात चक्क पेंग्विनसोबत राहण्याची संधी तिला मिळाली. अगदी पेंग्विनची सख्खी आई असल्यासारखी मधुमिता तिच्या सात पिल्लांची काळजी घेते. त्यांना खायला देते. त्यांचे दररोज चेक अप करते... दर आठवड्यातून एकदा वजन करते... इतकंच नाही तर त्यांच्यासोबत खेळतेदेखील...
कधी बॉल पेंग्विन्सना आकर्षित करतो तर कधी लाईट... तिच्याशी खेळताना पेंग्विन्स मस्तीही करतात. तिचा गमबूट ओढतात, कधी तिच्या जिन्सवर टोचा मारतात. कधी कधी तर पेंग्विन्स मधुमिताला चावतातदेखील... परदेशातला 'ठंडा ठंडा कूल कूल' वातावरणातला हा पक्षी मुंबईत आणायचा म्हणजे त्याला तसं पोषक हवामान देणं हे सर्वात मोठं आव्हान असतं. पण डॉ. मधुमिताच्या मदतीनं त्यांना आवश्यक असलेला सेट अप याठिकाणी उभारण्यात आलाय. १२-१३ डिग्री तापमान याठिकाणी ठेवण्यात येते. पाण्याचं तापमान दररोज तपासलं जातं. ६२-६३ % ह्युमिडीटी ठेवावी लागते.पेंग्विन आजारी आहे याकडं सतत लक्ष ठेवावं लागतं.
गेल्या वर्षभरापासून डॉ. मधुमिता सगळ्या पेंग्विन्सना सांभाळत आहे. तिला पेंग्विनचा एवढा लळा लागलाय की, आता पेंग्विन्सशिवाय राहता येणार नाही, असं ती सांगते... मला दुसरा जॉब करताना विचार करावा लागेल. घरीही पेंग्विनची आठवण येते. स्वप्नात पेंग्विन येतात. त्यांना काही झालं तर अशी भीती वाटते, असंही मधुमितानं म्हटलंय.
मधुमितानं सगळ्या पेंग्विन्सचं बारसंही केलंय... त्याच नावानं ती पेंग्विनला हाकही मारते. त्यांच्याशी गप्पाही मारते. पेंग्विनच्या तीन जोड्या इथं आहेत. एक आहे डोनल्ड आणि डेझी... दुसरी जोडी आहे ऑलिव्ह पोपोयची... आणि तिसरी मिस्टर मोल्ट आणि फिलपर... इथं एक लहान बेबी पेंग्विनही आहे. त्याचं नाव आहे बबल... पेंग्विन तंदुरूस्त राहण्यासाठी त्यांच्या आजुबाजुला स्वच्छ आणि साफ हवा असणं गरजेचं आहे. काही झालं तर त्यांच्यावर उपचार करणं आव्हानात्मक असतं. मुळात त्यांना काय होतंय हेच समजायला वेळ लागतो. पण आता प्रत्येक पेंग्विनचा स्वभाव माहित झाल्यानं त्यांना काय होतंय? हे मधुमिताला अचूक ओळखता येतं.
पेंग्विनचा मृत्यू झाला की, दरवेळी राजकारण रंगतं... त्यामुळं पेंग्विन्सची जबाबदारी घ्यायची म्हणजे डॉ. मधुमिता आणि तिच्या टीमवर कामाचा खूप ताण असतो. वर्षभरात डॉ. मधुमितानं आणखी तीन डॉक्टर्सना प्रशिक्षण देऊन तयार केलंय. पेंग्विनसारख्या मुक्या पक्ष्याची ती केवळ डॉक्टर नाही, तर आई आहे आई...