आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवू पाहणारी "कल्पिता"

२१ व्या शतकात पुरुषांसोबतचं स्त्रियादेखील प्रत्येक क्षेत्रात खंबीरपणे कार्यरत आहेत..

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 13, 2018, 04:19 PM IST
 आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवू पाहणारी "कल्पिता" title=

मुंबई : २१ व्या शतकात पुरुषांसोबतचं स्त्रियादेखील प्रत्येक क्षेत्रात खंबीरपणे कार्यरत आहेत..

स्त्रिया विविध समाजस्तरातून मेहनतीनं स्वतःची जागा निर्माण करतात. यामुळेच कि काय स्त्रियांना आपण आदिशक्तीचे रूप मानतो. स्त्रिया प्रत्येक प्रवासात स्वतःसोबत आपल्या कुटुंबाचा देखील विकास आणि सांभाळ करीत असतात. अनेक अडचणी, खाच खळगे पार करीत आपल्या आयुष्यातल्या एका महत्वाच्या टप्प्यापर्यंत पोहोचतात, मात्र इथे प्रवास संपत नाही तर खरा प्रवास इथून सुरु होतो. तो सर्व स्त्रियांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असतो. अशाच एका कलात्मक स्त्रीने आपल्या आयुष्यातले टर्निंग पॉईंट पार करत अनेक स्त्रियांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

अभुदय नगर मधील कामगार कल्याण येथे लहानाच्या मोठ्या झालेल्या कल्पिता राणे या व्हिएतनाम इथे पार पडलेल्या विश्वविजेती या स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधीत्व केले. विचारांमध्ये सुंदरता असणं म्हणजेचं सौंदर्याची व्याख्या असे मानणाऱ्या कल्पिता राणे यांचा वयाच्या १० व्या वर्षी  झाशीची राणी या मालिकेतून आपल्या करिअरची सुरवात केली आहे. या मालिकेत त्यांनी झाशीच्या राणीची बालपणाची भूमिका साकारली होती. इथून त्यांना आपल्यातील कलेच्या आवडीची जाणीव होत गेली. कल्पिता राणे यांनी भरतनाटयम या नृत्यकलेचं शात्रोक्त शिक्षण घेतलं आहे.

स्वतःला शात्रोक्त शिक्षणासाठी करावी लागलेली पायपीट अभुद्य नगरच्या येणा-या पिढीला करावी लागू नये, यासाठी त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षी आई-वडीलांच्या सहाय्याने कल्पांगण या संस्थेची निर्मिती केली. गेली १५ वर्षे ही संस्था अभुद्य नगरच्या अनेक नविन पिढ्यांना घडवत आहे. आज कल्पांगणच्या माध्यमातून ८२ मुलींना नाट्य, संगीत, तबला याचे प्रशिक्षण मिळते आहे. लग्नानंतरही कल्पिता यांनी कल्पांगणच्या मुलींना घडवण्याचे कार्य चालू ठेवले आहे.

सुलभाताई देशपांडे यांच्या अविष्कार शाळा या संस्थेतर्फे दुर्गा झाली गौरा या नृत्यनाटिकेतून कल्पिता यांनी काम केले होते. या नाटिकेची खासियत म्हणजे यामध्ये ३०-४० बालकलाकारांचा सहभाग होता. त्यांच्या या नाटकाच्या प्रवासाविषयी विचारले असता, "थिएटर म्हणजे काय आहे, तर हा अभिनयाच्या बाबतीतला एक संस्कार आहे. संस्कार घेण्याच्या वयात मी अविष्कार चंद्रशाळेत गेले. तिथे मी हा संस्कार शिकले, त्याने आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. मी याबाबतीत माझ्या आई-बाबांना खूप धन्यवाद देते, योग्य वयात त्यांनी मला योग्य ठिकाणी नेलं.

या नाटकाचे आम्ही ७० च्या वर प्रयोग केले असून प्रत्येक रिहर्सल आम्ही अगदी जिद्दीने करायचो, प्रेक्षकांसमोर एखादी कला सादर करताना ती पूरक असली पाहिजे हा संस्कार मी तिकडे शिकले." कल्पिता आणि कलेचा हा संगम त्यांच्या शालेय जीवनापासूनच सुरु झालेला होता, मात्र यामध्ये सात्यत्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी कल्पिता यांनी व्यवस्थितरित्या पार पडली.  लग्नानंतर त्या थांबल्या नाहीत. लग्न झाल्यावर सुद्धा कल्पिता यांनी अभ्युदय नगरच्या विवाहीत महिलांसाठी नृत्याचे शिक्षण देण्यास सुरु ठेवले. स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी कल्पिता यांनी आजवर अनेक उपक्रम राबवले आहेत.

गेल्याच वर्षी कल्पिता यांनी मिसेस इंडिया वर्ल्ड वाईड या सौंदर्य़ स्पर्धेत  भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेमध्ये अंतिम ५०जणींमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबातील कल्पिता यांनी बाजी मारली. व्हिएतनाम येथे पार पडलेल्या स्पर्धेमध्ये त्यांना “मिसेस टॅलेंटेड” हा किताब मिळावला. अनेक अडचणींचा सामना करत कुठेही न थांबता आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणार अशा जिद्दीच्या कल्पिता आहेत.  प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात मिस ते मिसेस हा प्रवास सगळ्यात कठीण असतो. प्रत्येक स्त्री हा प्रवास अनुभवत असते. या प्रवासाविषयी  सांगितले की "मीसुद्धा मिस ते मिस ते मिसेस या प्रवासाचा अनुभव घेतला आहे. आपल्या करिअरविषयीची माहिती पटवून देताना तुम्ही स्टेबल असणं गरजेचं आहे.

प्रत्येक गोष्टीला समजून घेण्यासाठी किंवा समजावून देण्यासाठी योग्य वेळ दिला की प्रवास आणखी सोपा होतो.पडतं. असाच प्रवास करत मीमिसेस इंडिया वर्ल्ड वाईड या स्पर्धेपर्यंत पोहोचले. " कल्पिता राणे यांचा हा प्रवास अनेक स्त्रियांसाठी एक आदर्श आहे. प्रत्येक स्त्रीने कठीणातल्या कठीण काळात ठामपणे उभं राहून येणाऱ्या प्रसंगाला धीटपणे सामोरे जाण्याचा, सल्ला कल्पिता देतात