मुंबई : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी म्हटलं की, महाराष्ट्राच्या जनतेने ५ वर्ष सेवा करण्याची संधी दिली म्हणून मी त्यांचे आभार मानतो. पंतप्रधान मोदी यांचे, सर्व अधिकारी, माझे सहकारी तसेच आमच्या सोबत असलेला आमचा मित्रपक्ष आणि त्यांच्या नेत्यांचे मी आभार मानतो. महाराष्ट्राचं सरकार आम्ही पारदर्शीपणे चालवलं. अनेक संकटांचा सामना आम्ही केला. दुष्काळ, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम केलं.'
'शिवसेनेची पहिल्या दिवशीच ही मानसिकता तयार झाली असावी. पवार साहेबांनी विरोधात बसण्याची भूमिका मांडली आहे. आम्ही सातत्याने चर्चेचा प्रयत्न केला. पण राष्ट्रवादी-काँग्रेससोबत चर्चेच धोरण शिवसेनेने स्विकारली. त्यांच्या आजुबाजुचे लोकं ज्या प्रकारे वक्तव्य करत आहे त्यांने माध्यमात जागा मिळेल पण सरकार नाही बनत. उत्तर द्यायची उत्तम क्षमता आमच्याकडे आहे. पण आम्ही ते करणार नाही.'
'काही लोकांनी ज्या प्रकारे वक्तव्य केली आहेत ती मनाला पटणारी नाहीत. बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी वंदनीय आहेत. २०१४ मध्ये ही आम्ही विरोधात लढलो पण उद्धवजी आणि बाळासाहेंबाविरोधात काहीही वक्तव्य केलं नाही. पण शिवसेनेने मोदींवर खालच्या दर्जाची वक्तव्य केली.'
'सरकारमध्ये राहून त्यांच्याच मोठ्या नेत्यावर टीका करणं आम्हाला मान्य नाही. धोरणाच्या ऐवजी व्यक्तींवर बोलणं आम्हाला जास्त आढळलं. जगाने मोदींचं नेतृत्व स्विकारलं. पण मित्रपक्षाने अशी टीका करणं आमच्या मनाला लागली. सोबत राहणार असून अशा प्रकारची टीका आणि शब्द कसे वापरायचे याबाबत ही चर्चा आधी झाली पाहिजे.'