राज्यात १० लाखहून अधिक ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

लॉकडाऊन काळात १५ मेपासून घरपोच मद्यविक्री अंमलात आणण्यात आली.

Updated: Jun 6, 2020, 11:13 PM IST
राज्यात १० लाखहून अधिक ग्राहकांना घरपोच मद्यविक्री      title=
संग्रहित फोटो

मुंबई : राज्यात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मद्यविक्रीची दुकानंही बंद करण्यात आली होती. त्यानंतर १५ मेपासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यास सुरुवात झाली. १५ मे ते ६ जून या कालावधीत राज्यात १० लाख ९ हजार ६७९  ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली आहे. 

आज दिवसभरात ६१ हजार ८१७ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आली. त्यापैकी मुंबई शहर आणि उपनगरात ३६ हजार ५१८ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री झाली.

लॉकडाऊन झाल्यापासून म्हणजेच २४ मार्चपासून ते ६ जूनपर्यंत राज्यात एकूण ७ हजार ३७० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. तर याप्रकरणी ३ हजार ४०९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय ६७० वाहनंही जप्त करण्यात आली आहेत. लॉकडाऊनच्या या काळात १८ कोटी ८१ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्यात २७३९ नवे कोरोना रुग्ण; दिवसभरात १२० जणांचा मृत्यू

 

राज्य शासनाने ३ मेपासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानंतर लॉकडाऊन काळात १५ मेपासून घरपोच मद्यविक्री अंमलात आणण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मे महिन्यात १ लाख १० हजार ७६३ ग्राहकांना परवाने मंजूर करण्यात आले. अवैध मद्य निर्मिती वाहतूक, तसंच विक्रीविरुद्ध तक्रार नोंदवता येऊ शकते. तक्रार करणाऱ्याचं नाव गुप्त ठेवण्यात येतं. १८००८३३३३३३  किंवा ८४२२००११३३ या क्रमांकावर किंवा commstateexcise@gmail.com ईमेलवर तक्रार दाखल करता येऊ शकते.  

मुंबईतील खाजगी रुग्णालयांवर आता आयएएस अधिकाऱ्यांची करडी नजर