Visarjan: गणेशभक्तांनो सावधान! विसर्जनावर घातक माशांचं सावट; सरकारचा इशारा, दिल्या 'या' सूचना

Ganesh Visarjan 2024 Government Warning: मुंबईच्या किनारपट्ट्यांवर यापूर्वीही असा प्रकार घडला होता. त्यावेळेस तब्बल 67 गणेशभक्तांना माशांनी चावा घेतला होता. यंदाही गणेश विसर्जनादरम्यान नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 8, 2024, 07:17 AM IST
Visarjan: गणेशभक्तांनो सावधान! विसर्जनावर घातक माशांचं सावट; सरकारचा इशारा, दिल्या 'या' सूचना title=
गणेशभक्तांना देण्यात आला इशारा

Ganesh Visarjan 2024 Government Warning: आज म्हणजेच 8 सप्टेंबर 2024 रोजी दीड दिवसांच्या बाप्पांना गणेश भक्त निरोप देतील. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनेक किनारपट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात घरगुती गणरायांचं विसर्जन केलं जातं. मात्र विसर्जनसाठी समुद्राच्या पाण्यात जाणं मुंबईकरांना महागात पडू शकतं. विसर्जनादरम्यान गणेश भक्तांना मत्स्यदंश करु शकणारे अपायकारक मासे मत्स्य विभागाच्या ट्रायल नेटिंगमध्ये आढळून आले आहेत. विशेष म्हणजे या अशा घातक माशांची संख्या चिंता वाढवणारी आहे. यासंदर्भातील मुंबई शहर जिल्ह्याचे मत्यस्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर विसर्जनाच्या वेळी नागरिकांनी अधिक सतर्क रहावे आणि काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. 

चाचपणीमध्ये कोणते मासे आढळून आले?

दादर आणि गिरगाव येथील चौपाट्यांवर महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाने चाचपणी केली. यामध्ये जेली फीश, ढोमी, कोळंबी, ब्लू जेली फिश, स्टिंग रे, शिंगटी, घोडा मासा, छोगे रावस असे मासे आढळून आले आहे. यापैकी काही माशांचा दंश गणेशभक्तांसाठी घातक ठरु शकतो. त्यामुळेच चौपाटीवर विसर्जनासाठी जाणाऱ्यांनी काही विशेष काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. गणेशमूर्तीचं विसर्जन हे मुंबई महानगरपालिकेमार्फत नेमणूक केलेल्या जीवरक्षक व संबंधित यंत्रणेच्या माध्यमातूनच करावे, असं सांगण्यात आलं आहे. गणपती विसर्जनाच्या वेळी गणेशभक्तांनी उघड्या अंगाने समुद्रात जाऊ नये, असंही सांगण्यात आलं आहे. सामान्यपणे विसर्जनच्या वेळी मासे पायांना दंश करतात. त्यामुळेच पायांना माशांनी दंश करु नये म्हणून गमबूट वापरावेत, असं प्रशासनाने सांगितलं आहे. 

67 जणांना घेतलेला चावा

काही वर्षांपूर्वी गणेशविसर्जनादरम्यान मुंबईकर गणेशभक्तांना स्टींग रे माशांनी चावा घेतला होता. त्यावेळेस या प्रकरणावरुन बराच गदारोळ झाला होता. तेव्हापासूनच सतर्कतेचा उपाय म्हणून विसर्जनाच्या आधी प्रशासनाकडून या समुद्रकिनाऱ्यांची चाचपणी केली जाते. जेली फिशला असलेल्या तंतूसदृश पट्ट्यांवर लिमॅटोसिस नावाचे रसायन असते. त्यामुळे अंगाची लाही होते. तर दुसरीकडे स्टिंग रे हा खोल समुद्रातील जीव असून तो दीड ते दोन मीटर व्यासाचा असतो. स्टिंग रे किनाऱ्यावर पिल्ले देऊन समुद्रात निघून जातो. स्टिंग रेची पिल्लांच्या शेपटीवरील अणकुचीदार काटे लागल्याने खोलवर जखमा होतात. 2013 मध्ये अशाप्रकारे समुद्रकिनाऱ्यावर तब्बल 67 गणेशभक्त जखमी झाले होते. या सर्वांवर उपचार करुन त्यांना घरी पाठवण्यात आलेलं.

 

विसर्जनाचा मुहूर्त कधी?

दीड दिवशीय गणपतीचे विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि शुभ वेळ दुपारी 02:08 ते दुपारी 03:41 त्यानंतर सायंकाळी 06:47 ते रात्री 11:08 दरम्यान आहे.