राज्यांतील शाळांमध्ये गांधी, आंबेडकरांपेक्षा आता अधिक वाचा नरेंद्र मोदी,

राज्याच्या शिक्षण विभागाने पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पूरक वाचन योजने अंतर्गत केलेली पुस्तक खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी खरेदी केलेल्या या पुस्तकांमध्ये नरेंद्र मोदींवरील पुस्तकांची संख्या आणि त्या पुस्तकांची किंमत लक्षणीय असल्याने विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतलाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले या तीन महान व्यक्तींची पुस्तक खरेदीची किंमत एकत्रित केली तरी येणाऱ्या रकमेपेक्षा मोदींवरील पुस्तक खरेदीची किंमत जास्त असून ती 60 लाखाच्या घरात आहे. मात्र ही सर्व खरेदी पारदर्शकपणे झाल्याचा दावा खुद्द शिक्षणमंत्र्यांनी केलाय.

Updated: Feb 13, 2018, 05:53 PM IST
राज्यांतील शाळांमध्ये गांधी, आंबेडकरांपेक्षा आता अधिक वाचा नरेंद्र मोदी,  title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्याच्या शिक्षण विभागाने पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पूरक वाचन योजने अंतर्गत केलेली पुस्तक खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी खरेदी केलेल्या या पुस्तकांमध्ये नरेंद्र मोदींवरील पुस्तकांची संख्या आणि त्या पुस्तकांची किंमत लक्षणीय असल्याने विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतलाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले या तीन महान व्यक्तींची पुस्तक खरेदीची किंमत एकत्रित केली तरी येणाऱ्या रकमेपेक्षा मोदींवरील पुस्तक खरेदीची किंमत जास्त असून ती 60 लाखाच्या घरात आहे. मात्र ही सर्व खरेदी पारदर्शकपणे झाल्याचा दावा खुद्द शिक्षणमंत्र्यांनी केलाय.

 राज्याच्या शिक्षण विभागाने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुस्तक खरेदी करताना आपले मोदी प्रेम दाखवून स्वामीनिष्ठा जपण्याचा प्रयत्न केलाय. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून शालेय शिक्षण विभागाने महान व्यक्तींवरील पुस्तकांची खरेदी केली आहे. या खरेदीत सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील पुस्तकांचा भरणा अधिक असल्याने  त्याबाबत आता नाराजीजा सूर उमटत आहे. 
 

सर्वात महाग पुस्तके

शिक्षण विभागाने नरेंद्र मोदींवरील 59 लाख 42 हजारांची पुस्तके खरेदी केली आहेत.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तके - 24 लाख 28 हजार
महात्मा ज्योतिबा फुलेंवरील पुस्तके - 22 लाख 63 हजार
तर महात्मा गांधीवरील पुस्तकांची किंमत आहे - 3 लाख 25 हजार

खरेदी करण्यात आलेल्या नेत्यांवरील पुस्तकांच्या संख्येवर एक नजर टाकूया..

छत्रपती शिवाजी महाराज - 3 लाख 40 हजार 982
एपीजे अब्दुल कलाम - 3 लाख 21 हजार 328
छत्रपती शाहू महाराज - 1 लाख 93 हजार 972
नरेंद्र मोदी - 1 लाख 49 हजार 954
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - 79 हजार 388
महात्मा ज्योतिबा फुले - 76,713
अटलबिहारी वाजपेयी - 76,713
बाळ गंगाधर टिळक - 75,778
साने गुरुजी - 73,726
कर्मवीर भाऊराव पाटील - 72,933
महात्मा गांधी - 9968
इंदिरा गांधी - 2,672
सावित्रीबाई फुले - 1,635
जवाहरलाल नेहरू 1,635

मोदींची पुस्तके महापुरूषांपेक्षा अधिक 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, यांच्यापेक्षा नरेंद्र मोदींवरील पुस्तकांची संख्या जास्त आहे. तर दुसरीकडे किंमतीची तुलना करता सर्वात जास्त किंमत ही नरेंद्र मोदींवरील पुस्तकांची असून ती 60 लाखाच्या घरात आहे. मात्र या पुस्तकांची खरेदी पारदर्शकपणे करण्यात आल्याचा दावा शिक्षणमंत्र्यांनी केलाय.

 विरोधकांनी या पुस्तक खरेदीबाबत शिक्षणमंत्री आणि सरकारवर टीका केलीय. भाजपा नेते इतिहासाच्या पानातून महापुरुषांची नावे पुसण्याचा उद्योग करत असल्याची टीका काँग्रेसने केलीय.

विरोधकांनी केला आरोप...

शालेय विद्यार्थ्यांना वाचनासाठी इतर महापुरुषांपेक्षा नरेंद्र मोदींवरील पुस्तकांची जादा खरेदी करून मोदींची प्रतिमा इतर महापुरुषांपेक्षा उंचावण्याचा प्रयत्न भाजपा करत असल्याचाही विरोधकांचा आरोप आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या पुस्तकात तर मोदींच्या चहा विकल्यापासूनच्या ते आतापर्यंतच्या छायाचित्रांचाच समावेश आहे. तर चाचा चौधरी या प्रसिद्ध कॉमिक बुकच्या धर्तीवर चाचा चौधरी और नरेंद्र मोदी या पुस्तकांचाही यात समावेश आहे. ही सर्व पुस्तके जिल्हा परिषदांच्या शाळेत अवांतर वाचणासाठी उपलब्ध करून दिली जाणार असून मोदींवरील पुस्तकांची संख्या आणि किंमतीमुळे ही खरेदी वादात सापडली आहे.