'तुला जनावराचं...', 10 वर्षे 50 अज्ञातांकडून आईवर अत्याचार करून घेणाऱ्या पित्याला पाहताच लेकीचा आक्रोश

Shocking News : भर न्यायालयात तिच्या भावनांचा बांध फुटला. घडलेल्या घटनेनं मन सुन्न झालं. न्यायालयानंही सुनावला कठोर निर्णय....   

सायली पाटील | Updated: Dec 20, 2024, 11:24 AM IST
'तुला जनावराचं...', 10 वर्षे 50 अज्ञातांकडून आईवर अत्याचार करून घेणाऱ्या पित्याला पाहताच लेकीचा आक्रोश  title=
shocking news France 72 year old man sentenced to 20 years in jail for drugging and inviting strangers to rape his exwife

Shocking News : महिलांवर होणारे अत्याचार ही एक गंभीर समस्या ठरत असून, संपूर्ण जगभरातून अशाच एका घटनेसंदर्भात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. फ्रान्समध्ये ही घटना घडली असून, त्याचं वर्णन वाचतानाही अनेकांचं रक्त गोठत आहे. मन सुन्न होत आहे. ही घटना एका अशा प्रकरणासंदर्भातील आहे जिथं नात्यांना आणि त्यातील विश्वासाला काळीमा फासला गेला. 

फ्रान्समधील न्यायालयानं 72 वर्षीय डोमिनिक पेलिकॉटला 20 वर्षांच्या सक्तीच्या कारावासाची शिक्षा सुनावली असून, पूर्वाश्रमीच्या पत्नीला म्हणजेच ज़ीज़ेल पेलिकॉटला नशेचा पदार्थ देत अज्ञातांकडून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आलं आहे. मागील 10 वर्षांपासून हे क्रूर कृत्य तो करत होता आणि यामध्ये 50 अज्ञातांचाही समावेश होता ही बाब या सुनावणीदरम्यान समोर आली. या अज्ञातांवरही न्यायालयानं विविध आरोपांअतर्गत गुन्हा दाखल करत त्यांना दोषी ठरवलं आहे. 

ज़ीज़ेल यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांपैकी एक नराधम पत्रकार, एक डीजे, एक अग्निशामक दलातील कर्मचारी, एक लॉरी चालक, एक सैनिक आणि एक सुरक्षा रक्षकही होता. 

सदर महिला आणि त्यांच्या तीन मुलांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय सुनावण्यात आला असून, भर न्यायालयातच त्यांच्या लेकीचा संताप इतका अनावर झाला की जन्मदात्याचाच विसर पडून तिनं सर्वांसमोर आक्रोश करत, 'तुला जनावराचं मरण येईल...' अशा शब्दांत आक्रोश केला. लेकीचे हे शब्द ऐकताना 'आपण तिच्या नजरेस नजर देत सांगू इच्छितो की मी काहीही केलं नाही. तिचं माझ्य़ावर प्रेम नसलं तरीही मी तिला तितकंच प्रेम करतो. मला माहितीये मी काय केलंय आणि काय नाही' असं डोमिनिक म्हणाला. 

हेसुद्धा वाचा : जगभरात श्रीमंतीचा रुबाब दाखवणारा Elon Musk प्रत्यक्षात रशियन एजंट? अमेरिका अद्दल घडवण्याच्या तयारीत 

आपल्यावर झालेले अत्याचार आणि त्याविरोधातील हा लढा आपण आपली तीन मुलं, नातवंड यांच्या भविष्याकडे खुणावत कुटुंब आणि या विदारक घटनेनं प्रभावित झालेल्या प्रत्येकासाठी लढल्याची प्रतिक्रिया न्यायालयाबाहेर दिली. हा आव्हानात्मक काळ असला तरीही आता मात्र आपल्याला पुढे जायला लागेल असं त्या म्हणाल्या. संपूर्ण जगभरात न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत झालं तर, डोमिनिक आणि त्याला या कृत्यात साथ देणाऱ्या दोषींच्या मानसिकतेचा नायनाट झालाच पाहिजे असा आग्रही सूरसुद्धा आळवला गेला.