Tamhini Ghat Private Bus Accident: रायगड-माणगाव पुणे मार्गावर ताम्हीणी घाटामध्ये वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात झाला आहे. ही खासगी बस रस्त्यावरुन खाली उतरुन डोंगर कड्याच्या बाजूला पडली. या अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताचं गांभीर्य पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ताम्हीणी घाट उतरताना बसच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर ही बस रस्ता सोडून बाजूला असलेल्या खड्ड्यात पडली. सुदैवाने बाजूला एक मोठा खडक असल्याने बस दरीत पडली नाही. ही बस पुणे येथून महाड तालुक्यातील बिरवाडीकडे जात होती. एका लग्न समारंभासाठी पुण्यातील वऱ्हाडी या बसमधून महाडच्या दिशेने प्रवास करत होते. माणगाव पोलीस अपघातस्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक यंत्रणेकडून मदत कार्य सुरू आहे. मृतांमध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातानंतरची अंगावर काटा आणणारं चित्र अपघाताच्या ठिकाणी दिसून आलं. अपघातातून वाचलेल्या प्रवाशांपैकी अनेक जण रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्याकडेला मदतीची वाट पाहत बसले होते. या बसमधून बाहेर पडलेले प्रवाशी रस्त्याच्या कडेला बसून होते. बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी या मार्गावरुन जाणाऱ्या इतरांनी मदत केली.
नक्की पाहा >> Video: CNG, LPG टँकरची समोरासमोर धडक, अग्नितांडवात 40 गाड्या खाक; अनेकांचा मृत्यू
1) संगिता धनंजय जाधव
2) गौरव अशोक दराडे
3) शिल्पा प्रदिप पवार
4) वंदना जाधव
5) अनोळखी पुरुष अजून नावं निश्चित नाही
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा पिंपरुड रस्त्यावरही आज एका कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर धडकल्याने हा भीषण अपघात झाला. या कार अपघातात तीनजण जागीच ठार झाले असून इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हळदीचा कार्यक्रम आटपून रावेरकडे जात असताना हा अपघात झाला. अपघातात शुभम सोनार, मुकेश रायपुरकर आणि केशव भोई अशी मृत्यू झालेल्या तीन मित्रांची नावे आहेत. तर गणेश भोई, अक्षय उन्हाळे आणि विकी जाधव या तिघांची प्रकृती गंभीर आहे.