डोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख तर जखमींना ५० हजार रुपये मदत

डोंगरी दुर्घटना : राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे. 

ANI | Updated: Jul 17, 2019, 09:54 PM IST
डोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख तर जखमींना ५० हजार रुपये मदत title=

मुंबई : डोंगरी परिसरातील अनधिकृत चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांचा आकडा १४वर गेला आहे. तर ढिगाऱ्याखाली दाबल्या गेलेल्या ९ जखमींना बाहेर काढण्यात आले आहे.  त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना पाच लाख रूपये आणि जखमींसाठी ५० हजार रूपये आणि जखमींचा सर्व वैद्यकीय खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, अशी घोषणा केली.

कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही १५ पेक्षा जास्त जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अरुंद रस्ता असल्यामुळे दुर्घटनास्थळी मदत कार्य पोहोचवण्यात अडथळे येत आहेत. डोंगरीच्या अब्दुल रहमान शाह दर्ग्याच्या मागे असलेली ही अनधिकृत इमारत होती. काल दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

दुर्घटनास्थळी अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे जवान याठिकाणी लोकांचे जीव वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेताना एनडीआरएफच्या पथकाला एक आई आणि दोन मुले बिलगलेल्या अवस्थेत सापडली. आई आणि तिची ६ आणि ८ वर्षांची दोन मुले ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. आईला बिलगलेला ६ वर्षांचा मुलगा आणि आई या दोघांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. पण आईच्या कुशीत पण थोडे अंतर राहीलेला आठ वर्षांच्या मुलाचा मात्र अंत झाला. जखमी अवस्थेत असलेल्या आई आणि ६ वर्षांच्या मुलावर उपचार सुरू आहेत.