पहाटेच्या शपथविधीवर बोलू नका, देवेंद्र फडणवीस यांची अजित पवारांना विनंती

'तुम्ही बोलू नका, मीही बोलत नाही'

Updated: Feb 27, 2020, 04:06 PM IST
पहाटेच्या शपथविधीवर बोलू नका, देवेंद्र फडणवीस यांची अजित पवारांना विनंती title=
संग्रहित फोटो

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एका रात्री घडामोडी घडवून पहाटे शपथ घेतल्याचा मुद्दा आज हलक्याफुलक्या स्वरुपात विधानसभेत चर्चिला गेला. आझाद मैदानात मराठा समाजातील मुलांचे आंदोलन सुरू आहे. त्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या मुलांना न्याय देण्याची मागणी करत, अजित दादा ऑन द स्पॉट निर्णय घेतात, जसं त्यांनी रात्री ठरवलं आणि सकाळी शपथ घेतली, याची आठवण चंद्रकात पाटील यांनी अजित पवारांना करून दिली.

याला उत्तर द्यायला अजित पवार उभे राहिले. मराठा मुलांचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार काय करतंय याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. उत्तराच्या शेवटी चंद्रकांत पाटील यांच्या शपथविधीच्या मुद्याला अजित पवार प्रत्त्युत्तर देणार इतक्यात समोरच्या बाकावर बसलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना थांबवलं.

देवेंद्र फडणवीस खाली बसूनच अजित पवारांना म्हणाले, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही बोलू नका, मीही बोलत नाही. अशा पद्धतीने पहाटेच्या शपथविधी मागचा इतिहास पुन्हा एकदा गुलदस्त्यातच राहिला.