मुंबई: कोरोना विषाणूच्या COVID-19 वाढत्या प्रादुर्भावामुळे रेल्वे आणि बेस्ट या वाहतूक सेवांना मोठा फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये अनेक लोकांनी ट्रेनच्या तिकिटांचे बुकिंग रद्द केले आहे. रेल्वेकडूनही लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वेला प्रवाशांना मोठ्याप्रमाणावर पैसे परत करावे लागत आहेत.
तर मुंबईत बेस्ट सेवेलाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. एरवी बेस्टच्या बसने दररोज ३२ लाख लोक प्रवास करतात. मात्र, कोरोनामुळे हा आकडा थेट २६ लाखांपर्यंत खाली आला आहे. तसेच तिकीट व पास या माध्यमातून बेस्टला दिवसाकाठी सरासरी २ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळायचे. हे उत्पन्नही घटून आता १ कोटी ६५ लाखांवर आले आहे. यामुळे बेस्टला प्रत्येक दिवशी तब्बल ३५ लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे.
याशिवाय, एसटी महामंडळालाही कोरोनामुळे मोठा तोटा सहन करावा लागत आहे. याचा सर्वाधिक फटका शिवनेरी बस सेवेला बसला आहे. हजारो फेऱ्या बंद केल्याने एसटी महामंडळाचे दिवसाला सुमारे दीड कोटी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे.
'वर्क फ्रॉर्म होम' नियमाची अंमलबजावणी न करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई
दरम्यान, गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे, मेट्रो, बेस्ट आणि एसटी सेवा ५० टक्के क्षमतेने चालवण्याच्या सूचना दिल्या आहेत. उद्यापासून बेस्टमध्ये प्रवाशांना उभे राहून देण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मात्र, यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी शाळेच्या बसेसचा वापर करण्यात येईल.