तेव्हा राज ठाकरे कुठे होते? उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरे यांना सवाल

राज्यातील राजकारण तापलं, उद्धव ठाकरे यांची राज ठाकरे यांच्यावर जहरी टीका

Updated: Apr 29, 2022, 08:36 PM IST
तेव्हा राज ठाकरे कुठे होते? उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरे यांना सवाल title=

ShivSena vs MNS :  बाबरी मशिद पाडली तेव्हा राज ठाकरे (Raj Thackeray) कुठे होते? मंदिरासाठी यात्रा सुरु होती तेव्हा राज ठाकरेचं काय सुरु होतं? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeay) यांनी विचारला आहे. 

इतकंच नाही तर भाजपवर (BJP) तुटुन पडा, सगळ्यांना सडेतोड उत्तर द्या. यांचं हिंदुत्व (Hindutwa) कसं बोगस आहे हे सगळ्यांना दाखवा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी प्रवक्त्यांच्या बैठकीत दिले आहेत.

शिवसेना प्रवक्तांची बैठक आज पार पडली. या बैठकीला स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका मांडली.

मनसेचं प्रत्युतर
1992 साली राज ठाकरे कुठे होते, हे उद्धव ठाकरेच सांगू शकतील, त्यांचं मेमरी कार्ड इरेज झालं का? असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.  उद्धव ठाकरे जेव्हा फोटोग्राफी करत होते, तेव्हा राज ठाकरे बाळासाहेबांबरोबर महाराष्ट्रभर सभा घेत फिरत होते, असं उत्तर संदीप देशपांडे यांनी दिलं आहे. 

राज ठाकरे यांना महाराष्ट्रातच नाही तर देशात लोकांचा जो प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे कदाचित गोंधळलेल्या मनस्थितीत मुख्यमंत्री असावेत अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे. 

कोण कोणाला दाखवा असं म्हणून दाखवता येत नाही तर प्रत्यक्ष कृती करावी लागते, जर यांचं हिंदुत्व खरं असेल तर भोंगे उतरावा आणि तुमचं हिंदुत्व सिद्ध करा असं आवाहनही संदीप देशपांडे यांनी दिलं आहे.  बाळासाहेबांच्या मुद्दयावर यांनी फारकत घेतली आहे आणि हे काय सांगणार तुटून पडा असा टोलाही शिवसेनेला लगावला आहे. 

औरंगाबादमध्ये शिवसेनेची बॅनरबाजी
राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये शिवसेनेनं जोरदार बॅनरबाजी केली आहे. 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यासम दुसरे होणे नाही' असं लिहून शिवसेनेनं राज ठाकरेंना डिवचलंय. यावरून शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांमध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगल्याचंही पाहायला मिळालं.