Vidhansabha Election 2024 : लोकसभा निवडणूक (Loksabha election) आणि त्यानंतरच्या निकालानंतर राज्यात अनेक राजकीय समीकरणं बदलली. महाराष्ट्रात बऱ्याच राजकीय घडामोडींना वेग आला आणि आता राज्यात चर्चा सुरू आहे ती म्हणजे विधानसभा निवडणुकीची. एकिकडे सत्ताधारी महायुती बहुमताच्या आकड्यावर लक्ष केंद्रीत करत असतानाच दुसरीकडे महाविकासआघाडीकडून सत्ताधाऱ्यांना तोडीस तोड आव्हान देण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहे. पक्षांतर्गत मोर्चेबांधणीलाही आता वेग आला असून, राज्यात विधानसभा निवडणूक नेमकी कधी आहे हाच प्रश्न सातत्यानं विचारला जात आहे.
खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीच या प्रश्नाचं उत्तर देत निवडणुकीच्या तारखेविषयी स्पष्ट संकेत दिले आहेत. चांदिवली इथं आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान विधानसभा निवडणुकीचे संकेत देत लक्षवेधी वक्तव्य केलं. येत्या दोन महिन्यानंतर नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका असल्याचं वक्तव्य शिंदेंनी केलं आणि त्यांच्या याच वक्तव्यानं उपस्थितांसह इतर अनेकांच्याच नजरा वळल्या. निवडणुकीचा उल्लेख करताना चांदिवली मतदार संघातून दिलीप लांडे यांना निवडून देण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
चांदिवलीतील कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक विकासकामं आणि मुंबईच्या विकासासंदर्भात वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन व इतर पुनर्वसन प्रकल्प रखडल्यामुळे मुंबईकर मुंबईबाहेर गेल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. याच धर्तीवर त्यांनी शहरातील ताटकळलेले प्रकल्प पुन्हा मार्गी लावणार असल्याचेही संकेत दिले.
काही दिवसांपूर्वीच महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यातच पार पडणार आहे.
मॅटच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुकीसाठी बदली करण्यात आलेल्या पोलिसांना त्यांच्या मूळ केंद्रावर पुन्हा पाठवल्यास विधानसभा निवडणुकीसाठी नव्याने बदल्यांची प्रक्रिया करावी लागेल. परिणामी लोकसभा निवडणुकीला बदली झालेल्या पोलिसांच्या बदल्या जैसे थे राहणार आहेत. थोडक्यात विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्येच पार पडणार हे जवळपास निश्चित झालं आहे.