'... तर लाडक्या बहिणींना 3000 रुपयेही देऊ' मुख्यमंत्र्यांचं विधान; भावांचाही केला उल्लेख

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान. भावांचा उल्लेख करत ते नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या सविस्तर वृत्त   

सायली पाटील | Updated: Sep 3, 2024, 09:01 AM IST
'... तर लाडक्या बहिणींना 3000 रुपयेही देऊ' मुख्यमंत्र्यांचं विधान; भावांचाही केला उल्लेख  title=
Cm Eknath Shinde ladki bahin yojana women will get 3000 rupies if mahayuti wins vidhansabha eletion 2024

Ladki Bahin Yojana :  आगामी विधासभा निवडणुकांच्या तारखांबद्दल अद्यापही स्पष्टोक्ती झालेली नसतानाच अनेक राजकीय विश्लेषक आणि तज्ज्ञ मंडळींनी ही निवडणूक दिवाळीनंतरच पार पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. इथं निवडणुकीच्या तारखांबाबत साशंकता असतानाच तिथं सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून मात्र आतापासूनच त्यासाठीची तयारी सुरू करत मोर्चेबांधणीला वेग दिला जात असल्याचं पाहायला मिळतंय. 

महायुतीकडून सध्या नागरिकांचं लक्ष वेधत समाजाताली तळागाळाच्या घटनांना केंद्रस्थानी ठेवत काही योजना राबवण्यावर भर दिला जात आहे. याच योजनांचा एक भाग म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आधार देण्याच्या हेतूनं राज्य शासनानं ही योजना सुरू केली. याच धर्तीवर आता नेतेमंडळींच्या वक्तव्यांमध्ये सातत्यानं या योजनेचा उल्लेख होताना दिसत आहे. 

राज्यातील कुटुंब सुखी होण्यासाठी आपल्या सरकारनं केलेल्या प्रयत्न पाहता याआधी कोणत्याही सरकारनं असे प्रयत्न केले नव्हते, असं म्हणत येत्या काळातही विधानसभा निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दिवाळीनंतर फटाके महायुतीच फोडणार असं म्हणताना त्यांनी आणखी एका मुद्द्यावर लक्ष वेधलं. 

'तुम्ही सरकारची ताकद वाढवली, तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी तीन हजारांहूनही अधिक रक्कम द्यायला हात आखडता घेणार नाही, भावांसाठीसुद्धा हेच पाऊल उचलणार', असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. ठाणे जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान ते उपस्थितांशी संवाद साधत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोणाचंही नाव न घेता विरोधकांनाही टोला लगावल्याचं पाहायला मिळालं. 

हेसुद्धा वाचा : 'शिवरायांनी ब्राह्मणशाहीला...', फडणवीसांच्या 'सुरत लुटली नाही'वरुन आंबेडकरांचा BJP, RSS ला टोला

 

लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनांची घोषणा झाल्यानंतर विरोधकांनी आपल्यावर टीका केली. पण, मी जे करतो तेच बोलतो असं म्हणताना लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी न्यायालयातील याचिकांचं उदाहरण देत त्यांनी 'सावत्र भावांपासून सावध राहा' असा इशारा उपस्थितांना दिला. 

आपण एक सर्वसामान्य नागरिक असून, ज्याप्रमाणं आधी हात दाखवा एसटी थांबवा अशी रीत होती, अगदी तसंच आपणही कोणी भेट घेण्यासाठी आलं, आपल्याला थांबवलं तर त्या व्यक्तीसाठी थांबणं अपेक्षित असतं असं ते म्हणाले. गरजूंची मदत झाली नाही, तर त्यांचा भ्रमनिरास होऊन समोरच्या व्यक्ती कायमचा नष्टही होऊ शकतो असं सूचक विधान त्यांनी केलं.