Salary Increment in FY 2025: चालू आर्थिक वर्ष पूर्ण होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असतानाच नव्या आर्थिक वर्षाच्या दृष्टीनं नवी आर्थिक धोरणं राबवली जाण्याकडे देशातील अर्थमंत्रालयाचा कल दिसत आहे. बहुविध क्षेत्रांची आर्थिकदृष्ट्या होणारी प्रगती हा मुद्दा इथं केंद्रस्थानी असतानाच सामान्य जनता पगारवाढीच्या चक्रात अडकल्याचं पाहायला मिळत आहे.
वर्षभरासाठी एखाद्या संस्थेमध्ये अहोरात्र काम करत मेहनत घेणाऱ्या नोकरदार वर्गासाठी नव्या वर्षाची सुरुवात होताच वेध लागतात ते म्हणजे पगारवाढीचे. चालू आर्थिक वर्ष संपत असतानाच नव्या आर्थिक वर्षात आपल्या वाट्याला नेमकी किती पगारवाढ येणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. याच पगारवाढीसंदर्भातील आकडेवारीसुद्धा नुकतीच समोर आली आहे.
एका सर्व्हेक्षणातून समोर आलेल्या वृत्तानुसार विविध क्षेत्रांमध्ये विविध हुद्द्यांवर नोकरी करणाऱ्यांना सरासरी 9.4 टक्के इतकी पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक वृद्धी आणि कुशल प्रतिभेची वाढ हे यामागचे संकेत असून, मर्सर या एचआर कन्सल्टन्सी कंपनीच्या सर्व्हेक्षणानुसार मागील पाच वर्षांमध्ये कर्मचाऱ्यांचा पगार सातत्यानं वाढला आहे.
2020 मध्ये झालेल्या 8 टक्क्यांच्या पगारवाढीच्या तुलनेत यंदाचा आकडा काही प्रमाणात वाढलेला असून, तो 9.4 टक्क्यांदरम्यान राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या सर्व्हेक्षणामध्ये विविध उपभोक्ता वस्तू, आर्थिक सुविधा, वाहन उत्पादन, यांत्रिक आणि तांत्रिक क्षेत्रातील काही कंपन्यांनी सहभाग घेतला होता. परिणामस्वरुप यंदाच्या वर्षी वाहन उत्पादन आणि तत्सम क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार 10 टक्क्यांनीसुद्धा वाढू शकतो असा अंदाज आहे.
गेल्या वर्षीच्या आकड्यांचा आधार घ्यायचा झाल्यास याच क्षेत्रात साधारण 8.8 टक्के इतकी पगारवाढ झाली होती. येत्या आर्थिक वर्षात इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये 9.7 टक्के पगारवाढीची शक्यता आहे. मर्सरच्या ‘इंडिया करियर लीडर’ मानसी सिंघल यांच्या माहितीनुसार भारतात कुशल कर्मचाऱ्यांच्या वाढत्या प्रमाणामुळं वगारवाढीचा आकडाही मोठ्या फरकानं वाढताना दिसत आहे.