महायुतीत कुरघोडी? अजित पवार नाराज, आमदारांसमोर बोलून दाखवली खदखद?

Maharashtra Political News: 2 मंत्र्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगित दिल्याने अजित पवार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. आमदारांच्या बैठकीत त्यांनी नाराजी बोलून दाखवली आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 15, 2025, 09:49 AM IST
महायुतीत कुरघोडी? अजित पवार नाराज, आमदारांसमोर बोलून दाखवली खदखद? title=
Maharashtra news Dispute erupts within Mahayuti DCM Ajit pawar upsets over two Ministry

सीमा आढे, झी मीडिया

Maharashtra Political News: राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र असे असले तरी अधून मधून महायुतीत कुरबुरी असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. महायुतीत परस्परांवर कुरघोडीला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय. राष्ट्रवादीच्या 2 निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याचं समजतेय. आमदारांच्या बैठकीतून अजित पवारांनी ही नाराजी बोलून दाखवली असल्याचंही कळतंय. 

राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी परस्पर स्थगिती दिल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवारांनी आमदार आणि मंत्र्यांची बैठक बोलावली आणि या बैठकीत त्यांनी नाराजी बोलून दाखवली, अशी माहिती सूत्रांनी दिलीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ आणि बाबासाहेब पाटील या दोन मंत्र्यांच्या खात्यातील निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याची माहिती मिळतेय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्र्यांचे प्रमुख म्हणून आपल्याशी मुख्यमंत्र्यांनी समन्वय साधायला हवा होता, अशी भावना अजित पवारांनी आमदारांसमोर व्यक्त केल्याचं बोललं जातंय. 

सत्तास्थापन झाल्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिलीच बैठक पार पडली होती. या बैठकीत पहिल्याच बैठकीत आमदारांना संबोधित करताना अजित पवारांनी नाराजी बोलून दाखवली आहे. परस्पर निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांनी दोन मंत्र्यांचे दोन निर्णय स्थगित केले. त्यांनी माझ्याशी चर्चा करायला हवी होती. नक्की काय समस्या होती. निर्णय का स्थगित केले याबाबत माझ्याशी बोलायला हवं होतं, असं पवारांनी म्हटलं असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. 

हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विभागाचा पदभार आहे. तर बाबासाहेब पाटील यांच्यावर सहकार विभागाची जबाबदारी आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर कुरघोडी केली जातेय का असा सवालदेखील उपस्थित केला जात आहे. आता या मुद्द्यावर अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काय चर्चा होतेय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

आज महायुतीच्या आमदारांची पंतप्रधान मोदी घेणार शाळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महायुतीच्या आमदारांचा क्लास घेणार आहेत. मुंबईतील नौदलाच्या आंग्रे सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी आमदारांशी संवाद साधणार आहे. तब्बल अडीच तास पंतप्रधान महायुतीच्या आमदारांसोबत संवाद साधतील. या कार्यक्रमात आमदारांना मोबाईल वापरण्यास बंदी असेल तसंच, मोबाईल विधानभवनात ठेवत आमदारांना सभागृहात पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत.