पाण्याची चिंता मिटली! मुंबईला पाणी पुरवठा करणारे सातही सातही धरणे काठोकाठमुंबईवरच पाणी कपातीचं संकट दूर झालं म्हणायला हरकत नाही. सात धरणांच्या पाणीसाठ्यात 97% वाढ झाली आहे. सातही धरणात भरघोस पाणीसाठा झाला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात दमदार पाऊस झाल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांच्या पाणीसाठ्यात यंदा भरघोस वाढ झाली असून सात धरणात मिळून 97 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
2 सप्टेंबर रोजी सातही धरणांच्या पाणीसाठ्याची नोंद घेण्यात आली. उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांमध्ये 96.93 टक्के पाणीसाठा आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या सात जलाशयांपैकी सर्व जलाशये यंदा 95 टक्के भरली आहेत. महत्त्वाचं म्हणजे मुंबईला आता पाणी कपातीला सामोरे जावे लागणार नाही कारण मुंबईच्या हद्दीतील विहार, तुळशी या जलाशयांबरोबरच भातसा आणि उर्ध्व वैतरणा ही दोन मोठी धरणे काठोकाठ भरली आहे.
ऑगस्ट महिन्यात किती पाऊस पडेल यावर ही तूट भरून निघते का याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष लागले होते. ही तूट भरून निघाली नसती तर पुढील वर्षी पुन्हा एकदा कपात करण्याची वेळ आली असती. मात्र ऑगस्ट महिन्यात मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये पडलेल्या पावसामुळे तलावांतील पाणीपातळीत रोज वाढ होत असून पाणीसाठा 97 टक्के झाला आहे.
जुलै महिन्यात कोसळणाऱ्या पावसामुळे सातही धरणांतील पाणीसाठ्यांत चांगलीच वाढ झाली. पाणीसाठा 73 टक्के झाल्यानंतर पालिका प्रशासनाने ऑगस्ट महिन्यापासून मुंबईतील 10 टक्के पाणी कपात मागे घेतली. कारण त्यावेळी धरणातील पाणीसाठ्यात 28 टक्के पाणीसाठा कमी होता.
उर्ध्व वैतरणा – 97.03 टक्के
मोडक सागर – 98.78 टक्के
तानसा – 98.24 टक्के
मध्य वैतरणा – 98.99 टक्के
भातसा – 95.60 टक्के
विहार – 100 टक्के
तुळशी – 100 टक्के
मुंबईतील सातही धरणांमध्ये 14 लाख 47 हजार दशलक्ष लीटर पाणी साठवू शकतो. त्याच्या तुलनेत सध्या या सातही धरणात 14 लाख 2 हजार 999 दशलक्ष लीटर पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा पाणी प्रश्न संपला आहे. पावसाळ्याचे चार महिने संपले की ऑक्टोबर महिन्यात पाणीसाठ्याचा आढावा घेतला जातो. यावेळी धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असतील तर पाणी कपातीची आवश्यकता नसते. मात्र थोडीशी तूट राहिली तरी पाणी कपात करण्याची वेळ येते. यंदा मात्र ही चिंता मिटल्याची चिन्हे आहेत.