मुंबई : आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालीय. पण दर कमी व्हायचे असतील, तर इंधनाचे पदार्थ जीएसटीच्या कक्षेत येणं अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्रानं त्यासाठी मंजुरी दिल्याचं सुतोवाच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पेट्रोल डिझेल जीएसटीत आल्याशिवाय दर कमी होणे दुरापास्त बनल्याचंही मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं. महाराष्ट्रातल्या जनतेला या दरवाढीचा सर्वाधिक फटका बसतोय. औरंगाबादमध्ये भारत पेट्रोलियमच्या पेट्रोलपंपांवर पेट्रोलच्या लीटरमागे ८६ रुपये ८५ पैसे मोजावे लागत आहेत. तर इंडियन ऑईलच्या पेट्रोलपंवर ८६ रुपये २७ पैसे मोजावे लागताय. अच्छे दिनचा वायदा करून सत्तेवर आलेलं मोदी सरकार आता मात्र जनतेच्या खिशावर उदार झालंय, असंच काहीसं चित्र दिवसेंदिवस निर्माण होताना दिसतंय.
केंद्र आणि राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमंतीमधून मोठ्या प्रमाणात महसूल गोळा करतात. काल केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत जनतेला दिलासा देण्यासाठी चर्चा झाली...पण आता फक्त चर्चा उपयोगी पडणार नाही असं जनता बोलू लागलीय. सत्तेत येऊन ४ वर्ष पूर्ण होत असताना मोदींच्या सरकारची प्रतिमा आता इंधन दराच्या भडक्यात दिवसेंदिवस काळवंडतेय हे मात्र नक्की.
वाढत्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. नरेंद्र मोदींनी आमच्यावर गाडी विकण्याची वेळ आणल्याची प्रतिक्रिया सामान्य लोक व्यक्त करताहेत. मुंबईत आज पेट्रोल ३० पैशांनी तर डिझेल २० पैशांनी वाढले आहे. पेट्रोल ८५.३३ रुपये प्रति लिटर तर डिझेल ७३ रुपये प्रति लिटर दरानं मुंबईत विकलं जातय.