मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचं राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे. मुंबईत घाटकोपरमधल्या चिराग नगर इथं येत्या वर्षभरात स्मारक पूर्ण करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही घोषणा केली आहे.
दीड दिवस शाळेत गेलेल्या चिराग नगरमधील १० x १० च्या खोलीमध्ये राहणाऱ्या अण्णाभाऊंनी अजरामर साहित्य लिहिलं आहे. अशा अण्णाभाऊ साठे यांचं राष्ट्रीय स्मारक होणार आहे. त्यासाठी चिराग नगरमधल्या रहिवाशांना त्यांच्या झोपडपट्टीचं पूनर्वसन करून त्यांना जवळच घरे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं आहे.
दुसरीकडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईतल्या परेलमधील ज्या बीआयटी चाळीमध्ये आपल्या आयुष्यातील २२ वर्षांचा कालखंड घालवला. त्याजागी आता राष्ट्रीय स्मारक करणार असल्याची घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. या वास्तूंमधील दोन खोल्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि त्यांचे कुटुंबीय राहत होते. त्या जागी आता राष्ट्रीय स्मारक होणार असून तिथल्या स्थानिकांचे पूनर्वसन करण्यात येणार आहे.