आदित्य ठाकरे यांच्या टीकेला भाजपचे प्रत्युत्तर, 'बरनॉल' जपून ठेवा!

 आदित्य ठाकरे यांच्या बोचऱ्या टिकेला भाजपकडून प्रत्युत्तर.

Updated: Dec 28, 2019, 04:57 PM IST
आदित्य ठाकरे यांच्या टीकेला भाजपचे प्रत्युत्तर, 'बरनॉल' जपून ठेवा! title=

मुंबई : भाजप सत्तेतून बाहेर गेल्याने ते आता जळत आहेत. त्यांना मी 'बरनॉल' लावण्याचा सल्ला देणार नाही, अशी टीका शिवसेना युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केली होती. या बोचऱ्या टिकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.  बरनॉल शिवसेनेने जपून ठेवावे, काही महिन्यानंतर तुम्हालाच त्याची गरज लागेल, असे प्रत्युत्तर भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी दिले आहे. शिवसेनेने पाठित खंजीर खूपसण्याचे काम केले आहे. भाजप-शिवसेना युतीला राज्यातील जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे त्यांनाच 'बरनॉल' जपून ठेवावा लागणार आहे. कारण कधी त्यांच्या सत्तेत आग लागेल ते कळणार नाही, असे लाड म्हणालेत.

शिवसेनेबरोबर सध्या जी विचारधारा आहे, ती कधी आग लावेल हे कळणार नाही, असे सांगत लाड यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची शिवसेना आठवण करा आणि दिलेला शब्द पूर्ण करा, ज्या लोकांबरोबर तुमची संगत आहे त्या संगतीमध्ये बिघडू नका हा आपला त्यांना सल्ला असल्याचे, लाड यावेळी म्हणाले..

आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?

शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले होते, शिवसेनेवर विरोधक जळत आहेत. कारण जे पूर्वी सत्तेत होते ते आता बाहेर गेले आहेत. या कारणास्तव ते नाराज आहेत आणि मी त्यांना कधीही 'बरनॉल' लावण्याचा सल्ला देणार नाही. तुम्ही ट्विट करत राहा, तुम्हाला आता काही काम राहिलेले नाही, असे ते म्हणालेत.

पुढे आदित्य म्हणाले, आम्हाला त्यांचे (भाजपचे) दुखणे समजले आहे. परंतु आम्ही आमच्या कामाकडे पूर्ण लक्ष देत आहोत. लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. आम्ही आमच्या आश्वासनांची पूर्तताही सुरु केली आहे. जसे कर्जमाफी, १० रुपयांत शिवभोजन दिले आहे. तसेच अनेक आश्वासनांची पूर्तता करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचे दुखणे आता कळत आहे. त्यांच्याकडे काम नसल्याने ते टीका करत आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते.