'आरे' पाकव्याप्त काश्मीर आहे का? आदित्य ठाकरेंचा सवाल

आरेमधील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयानं ४ ऑक्टोबर रोजी फेटाळून लावल्या

Updated: Oct 6, 2019, 04:01 PM IST
'आरे' पाकव्याप्त काश्मीर आहे का? आदित्य ठाकरेंचा सवाल title=

मुंबई : मुंबईतल्या आरेमध्ये 'मेट्रो ३' साठीच्या कारशेडसाठी मध्यरात्री झालेल्या वृक्षतोडीवर शिवसेनेसह अनेकांनी टीका केलीय. रातोरात झाडं तोडायला ते पाकव्याप्त काश्मीर आहे का? असा सवाल शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केलाय. तर आरेची जागा अभ्यासाअंती निश्चित केली. कमीत कमी वृक्षतोड करून प्रकल्प करावा, असं शासनानं 'एमएमआरडीए'ला सांगितलं आणि आराखडा तयार केल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. 

तसंच आंदोलनकर्त्यांना अटक करणं आणि त्यांच्यावर गंभीर गुन्हे नोंदवणं हेही चुकीचंच असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. पर्यावरणाच्या गप्पा मारत असतानाच मध्यरात्री पर्यावरण उद्ध्वस्त केलं जातं, असं म्हणत त्यांनी टीका केलीय.

तर उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करण्याचं आवाहन, मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी ट्विटरद्वारे केलं आहे.

आरेमधील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयानं ४ ऑक्टोबर रोजी फेटाळून लावल्या. त्यानंतर लगेचच वृक्षतोडसंदर्भात प्राधिकरणानं घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी, मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या अंधारातच पोलिसांच्या संरक्षणात सुरू केली. परिसरात आंदोलक जमा झाल्यानंतर जवळपास ४०० ते ५०० पोलीस तैनात करण्यात आले. बसच्या मार्गातही बदल करण्यात आले. तसंच आरेच्या परिसरात १४४ कलम (जमावबंदी) लागू करण्यात आलं. इतकंच नाही तर विरोध करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं.