रस्त्यावरील खड्डे आणि तुंबलेल्या पाण्यातून मुंबईकरांची सुटका कधी? शेलारांचा सवाल

आशिष शेलार यांनी घेतला आपत्कालीन परिस्थितीचा आढावा

Updated: Aug 4, 2020, 12:48 PM IST
रस्त्यावरील खड्डे आणि तुंबलेल्या पाण्यातून मुंबईकरांची सुटका कधी? शेलारांचा सवाल  title=

मुंबई : मुंबईत आज पावसाचा जोर असल्याने भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी तातडीने महापालिका मुख्यालयात जाऊन आपत्कालीन कक्षाच्या अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईत आज अनेक भागात पाणी साचले असून दरड ही कोसळली आहे.

दुपारी समुद्राला मोठी भरती असल्याने भितीचे वातावरण आहे. त्यामुळे आमदार अँड आशिष शेलार यांनी आज महापालिका मुख्यालयात जावून आपत्कालीन कक्षाकडून आढावा घेतला. कोरोनामुळे आपत्कालीन कक्षात प्रवेश निषेध करण्यात आला असून आपत्कालीन कक्षाचे प्रमुख अधिकारी महेश नार्वेकर यांची पालिकेतील भाजप कार्यालयात भेट घेऊन आमदार अँड आशिष शेलार यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. रस्त्यावरील खड्डे आणि तुंबलेल्या पाण्यातून मुंबईकरांची सुटका कधी ? असा सवालही यावेळी त्यांनी आयुक्तांना केला आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईसह सखल भागात पावसाचं पाणी साचलं आहे. मुंबई पोलीसांना खड्डे बुजवायला लावणाऱ्या राज्य सरकारचा आणि मुंबई महापालिकेचा जाहीर निषेध! मुंबई तुडुंब..रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य..दावे गेले वाहून...कोट्यवधीची कंत्राटे घेऊन कंत्राटदार फरार..कुठे आहेत पालिकेचे अधिकारी? कुठे आहेत सत्ताधारी? असा सवाल ट्विटवरून आशिष शेलार यांनी विचारला आहे.

मुसळधार पावसाचा परिणाम वाहतूकीवर झाला असून आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी कार्यरत असलेली मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.