चुकीला माफी नाही, मुनगंटीवारांच्या कबुलीजबाबावर अजितदादांची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपला लगावला टोला.

Updated: Mar 13, 2020, 01:01 PM IST
चुकीला माफी नाही, मुनगंटीवारांच्या कबुलीजबाबावर अजितदादांची प्रतिक्रिया title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : 'हो आम्ही शिवसेनेला फसवलं, आमची चूक झाली' या सुधीर मुनगुंटीवार यांच्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत भाजपला चांगलेच चिमटे काढले. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सुधीर मुनगुंटीवार म्हणतात चूक झाली, चूक झाली पण आता चुकीला माफी नाही, हे वक्तव्य करताना बाजूला बसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अजित पवारांनी कटाक्ष टाकला, त्यावर मानेने नकार देत उद्धव ठाकरे यांनीही चुकीला माफी नसल्याचं सुचित केलं.

आपलं सरकार होणार आहे होणार आहे.. असंच तुम्हाला पाच वर्ष म्हणावं लागेल, तुम्ही नाही म्हणालात तर पाठी बसलेले आमदार उठतील आणि निघून जातील, असा टोलाही अजित पवारांनी भाजपला लगावला.

इकडे ज्योतिरादित्य सिंधीया होणार नाही, तिकडे होणार नाही याची काळजी घ्या, असा उपरोधक सल्लाही अजित पवारांनी भाजपला दिला. मी जे करायचं ते लपून करत नाही, आता मी इथे मजबूत बसलोय, असा टोलाही अजित पवारांनी भाजपला लगावला.

'आम्ही शिवसेनेला फसवले, पण आमच्या चुकीचा तुम्ही एवढा मोठा फायदा फायदा उचलला. कधी ना कधी आम्ही ही चूक सुधारू', असं धक्कादायक विधान सुधीर मुनगुंटीवार यांनी विधानसभेत केलं होतं.