लग्नाच्या महिन्याभरातच पतीची हत्या, पत्नीची चौकशी करताच धक्कादायक सत्य समोर; कुकरमध्येच...

Crime News : यवतमाळमध्ये घडलेल्या या हत्याकांडाने सर्वांनाच हादरवून सोडलं होतं. पोलिसांनी सखोल तपास करुन आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकाराला काही तासांमध्येच बेड्या ठोकल्या होत्या. हत्येचा घटनाक्रम ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली होती.

आकाश नेटके | Updated: May 1, 2023, 01:36 PM IST
लग्नाच्या महिन्याभरातच पतीची हत्या, पत्नीची चौकशी करताच धक्कादायक सत्य समोर; कुकरमध्येच... title=

Crime News : लग्नाच्या (Marriage) गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असं म्हटलं जातं. पण इथं आई वडिलांच्या संमतीनेच त्यांची मुले लग्न करतात. दुसरीकडे सध्या मात्र मुले आणि मुली प्रेमविवाहांना पसंती देत आहे. मात्र त्यानंतरही काही नाती टिकत नाही. तर काही नाती ही जबरदस्तीने जोडली जातात. या नात्यांना शेवटी तडा जातोच. असाच काहीसा प्रकार यवतमाळमध्ये (yavatmal) घडला होता. लग्नानंतर महिनाभरातच पत्नीने पतीला संपल्याचा प्रकार काही वर्षांपूर्वी यवतमाळमध्ये घडला होता. उच्चशिक्षित असलेल्या पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या करून मृतदेह फेकून दिला होता. 2022 साली घडलेल्या या प्रकारामुळे यवतमाळमध्ये एकच खळबळ उडाली होती.

प्राध्यापकाची हत्या करुन पुलाखाली फेकला मृतदेह

 दिग्रस पोलिसांना 1 ऑगस्ट 2022 रोजी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह शेतातील पुलाच्या पाण्यात पडून असल्याची माहिती मिळाली होती. साधारणता 30 ते 35 वर्षे वयोगटातील असलेल्या या मृतदेहाच्या हातावर सचिन असे नाव गोंदवण्यात आले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला असता हा मृतदेह सचिन वसंतराव देशमुख (32 रा.उमरखेड) याचा असल्याचे समोर आले. पेशाने प्राध्यापक असलेले सचिन बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी त्यांचे कुटुंबिय उमरखेड पोलीस ठाण्यात गेले होते. त्याचवेळी त्यांना सचिनचा मृतदेह सापडल्याची माहिती देण्यात आली. सचिनच्या मृत्यूची माहिती समजताच देशमुख कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली होती.

लग्नानंतर महिन्याभरात पतीची हत्या

सचिन देशमुख यांच्या शवविच्छेदन अहवालातून त्यांचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. यानंतर पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याची नोंद करुन तपास सुरु केला. या प्रकरणात तक्रारदार हर्षद देशमुख यांनी सचिनची पत्नी धनश्री अशोकराव देशमुख हिच्यावर संशय व्यक्त केला होता. हत्येच्या महिन्याभरापूर्वीच धनश्रीचा सचिनसोबत विवाह झाला होता. लग्नानंतरही धनश्री आकोट येथे वनपाल म्हणून नोकरी करत होती. त्यामुळे दर शनिवारी सचिन धनश्रीला भेटण्यासाठी आकोट येथे जायचा. 29 जुलै रोजीही सचिनने त्याची बहिण सायलीला आपण धनश्रीला भेटायचा चाललो असल्याचे सांगितले होते.

प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं

मात्र त्यानंतर धनश्रीने सासऱ्यांना फोन करुन सचिन घरी आला आहे का अशी विचारणा केली. मात्र प्रत्यक्षात सचिन धनश्रीला भेटायला जात असल्याचे सर्वांनाच माहिती होते. त्यामुळे धनश्रीच्या बोलण्यावरुन देशमुख कुटुंबियांमध्ये संशय निर्माण झाला होता. त्यानंतर दोन दिवसांनी सचिनचा मृतदेह सापडल्याने त्यांनी धनश्रीवर संशय व्यक्त केला. पोलिसांनी धनश्रीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आपणच सचिनची हत्या केल्याचे कबूल केले. धनश्रीचे शिवम चंदन बछले याच्यासोबत प्रेमसंबध होते. त्यामुळे सचिनकडून धनश्रीला घटस्फोट हवा होता. घटस्फोटाला नकार दिल्यामुळे दोघांनी मिळून सचिनची हत्या केली.

कुकरमध्ये टाकून जाळले पुरावे

घटस्फोट देण्यास नकार दिल्यामुळे धनश्री आणि सचिनचा जोरदार वाद झाला. त्यानंतर 31 जुलैच्या रात्री धनश्री आणि तिच्या प्रियकराने मिळून सचिनचे हातपाय बांधले आणि त्याची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर सचिनचा मृतदेह गाडीत टाकून दिग्रस तालुक्यातील सिंगदच्या पुलाखाली फेकून दिला. त्यानंतर सचिनचे कपडे, हत्येसाठी वापरलेली दोरी कुकरमध्ये टाकून जाळून टाकले. यानंतर कुकर घासून साफ केला. या प्रकरणात शिवमचा भाऊ उपेन बछले यानेही मदत केली.

पोलिसांनी तपास केला असता सीसीटीव्हीमध्ये धनश्रीने हत्येत वापरलेले वाहन कारंजा येथील पेट्रोल पंपावर थांबलेले दिसले. धक्कादायक बाब म्हणजे सचिनचा खून केल्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह आकोटवरून अमरावती मार्गे दिग्रस येथे आणला होता. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी हत्येसाठी वापरण्यात आलेल्या गाडीचा अपघात झाला आहे असा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी गाडी अमरावती येथील शोरूममध्ये लावण्यात आली होती. यासोबतच पोलिसांनी धनश्री देशमुख हिचे कॉल रेकॉर्डिंगही तपासले होते. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करत न्यायालसमोर हजर केले होते. सध्या दोन्ही आरोपी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत