मुंबईबाहेर जात असाल तर थांबा! वाहतूक कोंडीतच अडकून दिवस जाईल; गाड्यांच्या लांबच लांब रांगा

Traffic Update: मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे (Mumbai Pune Expressway) तसंच जुन्या महामार्गावर (Old Mumbai Pune Highway) वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे लोकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागत आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 30, 2023, 10:53 AM IST
मुंबईबाहेर जात असाल तर थांबा! वाहतूक कोंडीतच अडकून दिवस जाईल; गाड्यांच्या लांबच लांब रांगा title=

Mumbai Pune Expressway Traffic Jam: सुट्टी असल्याने कारने मुंबईबाहेर जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही वाहतूक कोंडीत अडकण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे (Mumbai Pune Expressway) आणि जुन्या महामार्गावर (Old highway) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. विकेंडसह सोमवारीही सुट्टी असल्याने अनेकजण कुटुंबासह फिरण्यासाठी मुंबईबाहेर जात असल्याने एक्स्प्रेस-वेवर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. मुंबईकडून पुण्याला जाण्याच्या दिशेला वाहनांच्या तब्बल 10 किमी लांब रांगा लागल्या आहेत. खोपोलापासून ते खंडाळापर्यंत या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

वाहतूक कोंडी नेमकी कुठे?

रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाड्या आल्या असल्याने खोपोलीजवळ बोरघाटात वाहतुकीची कोंडी झाली आहे. सायमाळ भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खंडाळाजवळ वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. वाहतूक पोलीस घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. खंडाळा बोगद्याजवळ मुंबईकडून येणारी वाहतूक थांबवून पुण्याकडे जाणारी वाहने मुंबई लेनवरून सोडली जात आहेत. वाहनांच्या तब्बल 10 किमीपर्यंत रांगा लागल्या आहेत. 

शनिवारीही  मुंबईकडून  पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.बोरघाटात वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. वाहनं अत्यंत धीम्या गतीने पुढे सरकत होती. यामुळे वाहनांना काही किमी अंतर कापण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागत होती. खंडाळा घाटात मुंबई लेनवर अधूनमधून दहा मिनिटांचा ब्लॉक घेवून पुण्याकडे जाणारी वाहने मुंबई लेनवरुन सोडण्यात आली होती. 

70 वाहनं बंद पडली

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर अनेक वाहनं बंद पडली आहेत. बोरघाटात जवळपास ७० वाहनं बंद पडली आहेत. यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. काही वाहनांचे इंजिन अधिक गरम झाले आहेत. क्लच प्लेट गरम झाल्याने वाहने बंद पडत असल्याचे प्राथमिक कारण समोर आलं आहे. बंद पडलेली वाहने बाजूला थांबवण्यात आली आहेत. 

वाहतूक कोंडीचं कारण काय?

1 मे रोजी महाराष्ट्र दिन असल्याने वीकेंडला लागून सुट्टी आली आहे. यामुळे अनेकजण कुटुंबासह लोणावळा, खंडाळा अशा पर्यटनस्थळी फिरायला बाहेर पडत आहेत. त्यातच शाळेच्या सुट्ट्या असल्याने अनेकजण गावीही जात आहेत. त्यामुळे फक्त पुणे मार्गावरच नव्हे तर कोकण, नाशिकला जाणाऱ्या मार्गांवरही वाहनांची वर्दळ नेहमीपेक्षा जास्त असून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. 

एक्स्प्रेस-वेवर अपघातांची मालिका

दरम्यान एक्स्प्रेस-वेवर गेल्या काही दिवसांपासून अपघातांची संख्याही वाढू लागली आहे. गुरुवारी पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात झाला होता. यावेळी तब्बल 11 वाहनं एकमेकांना धडकली होती. खोपोली एक्झिटजवळ झालेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. दरम्यान जखमींना रुग्णालायत दाखल करण्यात आलं होतं. या अपघातानंतर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.