रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : NRC आणि CAA विरोधात सांगली जिल्हा बंद आंदोलनावेळी आटो रिक्षाच्या काचा फोडल्या गेल्या. काही तरुणांनी सांगली मिरज रोडवर जबरदस्तीने रिक्षा बंद केल्या. तर सांगलीत व्यापाऱ्यांना जबरदस्तीने दुकाने बंद करायला लावली. या विरोधात आता सांगलीकर चांगलेच आक्रमक झालेत. महापुराने कंबरडे मोडले असताना हा तिसरा बंद का ? असा प्रश्न सांगलीकर उपस्थित करत आहेत.
या विरोधात आता सांगलीतील व्यापारी उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी दिली. दरम्यान काही हुल्लडबज तरुण बाजारपेठ बंद करत असताना यावेळी व्यापारी आणि तरुणांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.
बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने येणार एनआरसी आणि सीएए विरोधात बंद आंदोलन पुकारण्यात आला. सांगली आणि मिरज मध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. दोन्ही शहरात बंद संमिश्र प्रमाणात बघायला मिळाला. मिरजेत शहरात भव्य मोर्चा काढून आंदोलकांनी NRC आणि CAA विरोधात आपला विरोध व्यक्त केला.
सांगली जिल्ह्यात ऑगस्ट २०१९ साली येऊन गेलेल्या महापुरामुळे मोठं नुकसान सांगलीकरांना सहन करावं लागलं. व्यापारीपेठा उध्वस्त झाल्या, मात्र अशातच सांगलीबंदच्या आवाहना बद्दल संतप्त प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहे. व्यापारी पेठा महापुरामुळे उध्वस्त झाल्या असताना अशा प्रकारे बंद करून व्यापाऱ्यांचे नुकसान आणि नागरिकांचे हाल करण्यापेक्षा अन्य मार्गाने आंदोलन केली पाहिजेत अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिक आणि व्यापारी व्यक्त करत आहेत.
महापुरानंतर तीन बंद पाळण्यात आले. ऑगस्ट २०१९ साली आलेल्या महापुराने सांगलीकरांचे न भरून येणारे नुकसान झाले. शहरातील व्यापारपेठ उध्वस्त झाल्या. व्यापारी रस्त्यावर आले, अनेकांचे संसार उघड्यावर पडले. अशातच सांगलीकरांना शून्यातून सुरवात करत आपला व्यवसाय पुन्हा न्यव्याने उभा केला. महापुरामुळे धंद्यात मंदी, त्यातच दिवाळीचा सण हि वाया गेला. अनेक अडचणीतून व्यापारी सावरत असतानाच शिवप्रतिष्ठानच्या वतीने दोन वेळा तर बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने आज बंद पुकारण्यात आला.
महापुरातून आता कुठे सावरत असताना बंद पाळण्या ऐवजी अन्य लोकशाही मार्गाने आंदोलन केले पाहिजे, धरणे आंदोलन, मोर्चे, निवेदन यांद्वारे हि आंदोलन करता आले असते अशी संतप्त प्रतिक्रिया आता व्यापारी आणि सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होते आहे.
यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाने आंदोलन करत असताना महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे भान ठेऊन व्यापारी आणि सामान्य नागरिकांची कुचंबणा होणार नाही याचा विचार करण्याची विनंतीही यावेळी व्यापाऱ्यांनी केली. तसेच सततच्या बंद मुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी व्यापारी आता उच्च न्यायालयात जाणार आहेत.